कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
Kalyani Nagar accident
कल्याणीनगर अपघात File Photo
Published on
Updated on

रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करून त्याद्वारे खोटा अहवाल तयार करणे म्हणजे बहुमूल्य दस्तावेजांचे बनावटीकरण आहे, असे निरीक्षण नोंदवित विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. आदित्य अविनाश सूद (वय 52, रा. सोपान सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय 37, रा. स्काय वेल्वेडर सोसायटी, विमाननगर) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. ‘पोर्शे’ कारचालकाच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात सक्रिय सहभागाप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणात, सहभाग उघड झाल्यावर सूद आणि मित्तल अटकेच्या भीतीने परराज्यात पळून गेले होते. पुणे पोलिसांची पथके आपल्या मागावर असल्याचे कळताच आरोपी पुण्यात परतले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयीन कोठडी झाल्यावर दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध केला. विविध साक्षीदारांचे जबाब आणि सीए अहवालाच्या आधारे दोन्ही आरोपींचा रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकारात सहभाग असल्याचे विशेष सरकारी वकील हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद मान्य करत दोघांना जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे, दोघांचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

कल्याणीनगर परिसरातील पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालक मुलगा व पाठीमागच्या सीटवर असलेल्या दोन मित्रांनी अपघाताच्या घटनेपूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपानाची पार्टी केली होती. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे कारचालकाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी आदित्य सूद व आशिष मित्तलने ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली. त्यानंतर आदित्य सूदने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्याच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर आशिष मित्तलने आरोपी अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसर्‍या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news