पुढारी वृत्तपत्रसमूह आणि पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेल्या गणाधीश नवोन्मेष स्पर्धेतील पारितोषिकविजेते कोण? या प्रश्नाचे उत्तर उद्या मंगळवारी 1 ऑक्टोबरला मिळणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी 5 वाजता भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये होणार असून, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रायोजक असलेले युवा उद्योजक पुनीत बालन, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. भावार्थ देखणे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आदी नामवंत लाभले आहेत. तसेच, जतीन पांडे यांच्या नटरंग अकादमीच्या कलाकारांचा नृत्य-संगीताचा धमाल कार्यक्रम हेही या कार्यक्रमाचे आकर्षण राहणार आहे. पुढारी अन् पुनीत बालन ग्रुपने पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेला पुण्यातील मंडळांनी जोरदार आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यात पुण्यातल्या पेठांमधील मंडळांबरोबरच अनेक उपनगरांतील मंडळांनीही उत्साहाने भाग घेतला. तज्ज्ञ परीक्षकांच्या चार पथकांनी सलग चार दिवस या मंडळांना भेट देऊन आपला अहवाल सादर केला. त्यानुसार पारितोषिकप्राप्त मंडळांची नावे कार्यक्रमात जाहीर केली जातील आणि तेथेच त्यांचे वितरण केले जाईल.
पारितोषिक वितरण
समारंभ सावित्रीबाई फुले स्मारक, महात्मा फुलेवाडा आणि भवानी पेठ अग्निशमन केंद्राशेजारी,
भवानी पेठ येथे.
मंगळवारी 1 ऑक्टोबर 2024 रोजी, सायंकाळी 5 वाजता. कार्यक्रमात पारितोषिक वितरण, मान्यवर पाहुण्यांची भाषणे आणि जतीन पांडे यांच्या नटरंग अकादमीचा नृत्य, संगीतप्रधान जल्लोष.