गणेश खळदकर
दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा मार्चअखेरपर्यंत पूर्ण होतात, परंतु या परीक्षा संपल्यानंतर अकरावीचे वर्ग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू होण्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजेच दिवाळी उजाडते. त्यामुळे सरकारी काम प्रवेशासाठी सहा महिने थांब, असे म्हणण्याची वेळ विद्यार्थी-पालकांवर आल्याशिवाय राहत नाही.
अकरावीचे प्रवेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येतात. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेल तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. त्याचबरोबर आयटीआयची प्रवेश प्रक्रिया व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येते. परंतु या प्रवेश प्रक्रिया राबविणार्या संस्थांकडून प्रवेश प्रक्रिया अत्यंत संथगतीने राबविली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो, परंतु याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात दरवर्षी प्रवेश प्रक्रियेचे गुर्हाळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू असल्याचे दिसून येते. दहावीची परीक्षा मार्च महिन्यात होते, तर अकरावीचे वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास दिवाळी उजाडते. म्हणजेच दहावीनंतरचे विद्यार्थी तब्बल सहा ते सात महिने काहीही करत नाहीत.
बारावीची परीक्षा मार्च महिन्यात संपते. इंजिनियरिंग, मेडिकल यांसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्गदेखील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतात. म्हणजे बारावीचे विद्यार्थीदेखील सहा ते सात महिने काहीच करत नाहीत.
परीक्षा संपल्यानंतर सहा ते सात महिन्यांच्या काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होते. त्यांच्या आयुष्यातला मौल्यवान वेळ वाया जातो, याकडे संबंधित प्रवेश प्रक्रिया राबविणार्या संस्थांनी गांभिर्याने लक्ष देऊन कमीत कमी कालावधीमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पावले उचलणे गरजेची असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा होऊन अकरावी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होण्यास जवळपास सहा ते सात महिने लागतात. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील दारिद्य्र स्पष्ट करणारे आहे. प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण पार पाडता येऊ शकते आणि हा पाच-सहा महिन्यांचा कालावधी कमी करण्यात आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. फक्त यासाठी शासनकर्त्या वर्गाची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने ती आज दिसत नाही.
डॉ. प्रकाश पवार, अध्यक्ष, शिक्षक हितकारणी संघटना
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटींची संख्या कमी करणे आवश्यक
सीईटी परीक्षा झाल्यानंतर
दोन ते तीन दिवसांमध्ये निकाल जाहीर करणे गरजेचे
प्रवेश प्रक्रिया कमीत कमी कालावधीमध्ये आणि कमी फेर्यांमध्ये राबविणे गरजेचे
महाविद्यालयांमध्येच कागदपत्रे उपलब्ध करा
प्रवेशासाठी कमीत कमी कागदपत्रांची व्हावी मागणी
प्रवेश प्रक्रिया जास्तीत जास्त ऑनलाइन पद्धतीने पार पडणे गरजेचे