वरवंडमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. येथील कातोबानगरच्या जानाईमळ्यात बिबट्याने 4 शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे स्थानिक नागरिक व शेतकरीवर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कातोबानगरच्या जानाईमळा परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. या ठिकाणी सातत्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्यातच विकास शिवणकर यांची शेळी बिबट्याने फस्त केली. त्यानंतर वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावला. या कॅमेर्यातदेखील बिबट्या कैद आढळून आला. मात्र अजूनपर्यंत बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला नसल्याचे वरवंडचे पोलिस पाटील किशोर दिवेकर यांनी सांगितले.
बिबट्याचा वावर हा उसाच्या पट्ट्यात असून, भरदिवसासुद्धा शेतकरी शेतात जाण्यासाठी धजावत नाहीत. एकीकडे शेतात काम करण्यास मजूर मिळत नाहीत, तर दुसरीकडे बिबट्याच्या दहशतीमुळे आणखीनच अडचण वाढली आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. गुरुवारी (दि. 29) मध्यरात्री शिवाजी सर्जेराव दिवेकर यांच्या 4 शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करीत त्यांचा बळी घेतला.
या घटनेची माहिती मिळताच वरवंड परिक्षेत्राच्या वनपाल शीतल खेंडके व शीतल मेरगळ यांनी पंचनामा करून घरासमोरील शेतात ट्रॅप कॅमेरा बसविला. मात्र नुसते ट्रॅप कॅमेरे बसवून उपयोग नाही; तर बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे काम वन विभागाने करणे गरजेचे असल्याचे स्थानिक सांगत आहेत.
वरवंड परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, आम्ही ट्रॅप कॅमेरा बसविण्याचे काम हाती घेतले आहे. नागरिकांनीदेखील वन विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे. वन विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ज्या ठिकाणी शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत, त्याचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
राहुल काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, दौंड
बिबट्याचे हल्ला दिवसेंदिवस वाढायला लागले असून, नुसती जनजागृती करून उपयोग नाही. तर प्रत्यक्षात पिंजरा लावून बिबट्याला पकडणे गरजेचे आहे. एखाद्या शेतकर्याचा बिबट्याने जीव घेतल्यानंतरच पिंजरा लावणार का ? स्थानिकांमध्ये घबराट पसरली असून, तत्काळ बिबट्याला पकडण्याची कारवाई हाती घ्यावी.
कांता टेंगले, सदस्य, वरवंड ग्रामपंचायत