पुणे ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल परीषदेमार्फत जाहीर करण्याअगोदरच समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा प्रकार लक्षात येताच परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा २०२१चा अंतिम निकाल आणि गुणवत्ता याद्या अद्याप जाहीर करण्यात आल्या नसल्याचे स्पष्टीकरण संकेतस्थळावर देण्यात आले आहे. (State Examination Council )
राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यात शिष्यवृत्ती परीक्षा २०२१चा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. तर अंतिम निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी-पालकांना प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण विभागाची राज्य गुणवत्ता यादी समाजमाध्यमांत फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने संभ्रम निर्माण झाला.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले, की पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल २४ नोव्हेंबरलाच जाहीर झालेला आहे. त्यानंतर या निकालावरील हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली.
आलेल्या आक्षेपांची पूर्तता करून अंतरिम निकाल अद्यायवत करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
तर अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी संकेतस्थळावर चाचणी घेतली जात असताना त्रयस्थ व्यक्तींने संकेतस्थळाच्या लिंकवरून निकालाची माहिती डाऊनलोड केली.
हा प्रकार निदर्शनास आल्यावर ती लिंक बंद करण्यात आली आहे. संकेतस्थळाचे काम पाहणार्या संबंधित कंपनीकडून खुलासा मागवण्यात आला आहे. परीक्षेचा अंतिम निकाल पुढील येत्या दोन ते तीन दिवसांमध्येच जाहीर करण्यात येणार आहे.