पुणे : इंदापूर पोलीसांनी पकडला तब्बल २१ लाखांचा गुटखा; दोघांवर गुन्हा दाखल - पुढारी

पुणे : इंदापूर पोलीसांनी पकडला तब्बल २१ लाखांचा गुटखा; दोघांवर गुन्हा दाखल

इंदापूर (जि. पुणे), पुढारी वृत्तसेवा

इंदापूर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई करत तब्बल २१ लाख रुपयांचा विक्रीस चाललेला गुटखा ताब्यात घेतला. या कारवाईत एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) करण्यात आली.

याप्रकरणी इंदापूर पोलिसांत गणेश आबासो चव्हाण (वय २५, शेटफळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) व गाडीमालक चंद्रकांत क्षीरसागर (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती इंदापूरचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.

इंदापूर-गलांडवाडी सेवा रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान संशयावरून पोलिसांनी टेम्पोची (एमएच ४५ एई ५३४८) तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीसाठी चाललेला गुटखा पोलिसांना मिळून आला. यामध्ये विविध कंपन्यांची एकूण ४० पोती आणि २५ बॉक्स असा एकूण २१ लाख रुपयांचा गुटखा व १५ लाखांचा टेम्पो असा ३६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, पोलिस उपनिरीक्षक दाजी देठे, पोलिस नाईक मनोज गायकवाड, अमोल खैरे, नीलेश फडणीस यांनी केली.

हेही वाचा

Back to top button