पुणे : शेलपिंपळगाव येथे जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू | पुढारी

पुणे : शेलपिंपळगाव येथे जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू

चाकण (जि. पुणे) : पुढारी वृत्तसेवा

बांधावरील कडूलिंबाच्या झाडाच्या फांदीला जुन्नर तालुक्यातील जांभूळसी येथील एका तरुण-तरुणीने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत तरुणीला करकचून गळफास बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर, तरुण बेशुद्ध असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव नजीक मोहीतेवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत सोमवारी (दि. २०) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

सुषमा दिनकर सोनवणे (वय २२, रा. जांभूळसी, पो. मांडवे, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर हरिदास कुंडलिक देवचे (वय २८, रा. जांभूळसी, पो. मांडवे, ता. जुन्नर) असे बेशुद्ध आणि प्रकृती चिंताजनक असलेल्या तरुणाचे नाव आहे. शेलपिंपळगावचे पोलिस पाटील गोरक्षनाथ नामदेव गायकवाड (वय ५३, रा. शेलपिंपळगाव) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सुषमा व हरिदास हे दोघे एकाच गावचे राहणारे आहेत. शेलपिंपळगाव नजीक मोहीतेवाडी गावच्या हद्दीतील गट नं. ४०१ मध्ये सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान त्या दोघांनी एकत्रित झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. दुर्दैवाने या घटनेत सुषमा हिचा जागीच मृत्यू झाला, तर हरिदास हा बेशुद्ध पडला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

या घटनेमागचे नेमके गौडबंगाल काय, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जुन्नर तालुक्यातून ही जोडी नेमकी कशासाठी आली होती, याचा चाकण पोलिस शोध घेत आहेत. चाकण ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू आहे.

Back to top button