पुणे : महाविकास आघाडीच्या अधःपतनाची सुरुवात पुण्यातून – गृहमंत्री अमित शाह | पुढारी

पुणे : महाविकास आघाडीच्या अधःपतनाची सुरुवात पुण्यातून - गृहमंत्री अमित शाह

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सत्तेसाठी शिवसेनेने भाजपचा घात केला आहे. हिंमत असेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. राज्यातील महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी. मग त्यांना भाजपची खरी ताकद कळेल,’ असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांनी दिले. ‘मी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असे बोललो होतो. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता,’ असे स्पष्टीकरणही शाह यांनी दिले.

पुणे शहर भाजपच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी (दि. १९) बूथ कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शाह बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह आमदार, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शाह यांच्या हस्ते मोदी सरकार व महापालिकेच्या योजनांची व कामांची माहिती असलेल्या अटलशक्ती महासंपर्क अभियान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

शिवसेनेने विश्वास घात केला

शाह म्हणाले, “2019 मध्ये शिवसेनेसोबत मी बोललो होतो. तेव्हाच मी निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि निवडणुकीनंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, आम्ही खोटे बोलतो, असा कांगावा करून शिवसेनेने सत्तेसाठी व मुख्यमंत्रिपदासाठी आमचा विश्वासघात केला.

” देशभरात 15 रुपये स्वस्त डिझेल व पेट्रोल मिळते, महाराष्ट्रात ते का झाले नाही, असा सवाल उपस्थित करीत शाह यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि भ्रष्ट प्रशासन, हे एकच काम राज्य सरकार करीत आहे. भाजप कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना धमकाविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. मात्र, भाजप कार्यकर्ते त्याला घाबरणार नाहीत, असे सांगितले.

ठाकरे सरकारची तीनही चाके पंक्चर

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे सरकार म्हणजे तीन चाकी रिक्षा आहे. तीनही चाकांची दिशा वेगळी आहे. ही तीनही चाके पंक्चर असल्याने त्यांची रिक्षा चालतच नाही, केवळ धूर सोडते. असे हे निष्क्रिय सरकार महाराष्ट्राला पूर्वीचे दिवस आणून देणार नाही. या निष्क्रिय सरकारचे अधःपतन पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालापासून सुरू होईल. महापालिका निवडणुकीत भाजप नगरसेवकांची संख्या 120 नव्हे, तर त्यापेक्षाही जास्त देण्यास पुणेकर उत्सुक आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील विजयाचे बीज पुण्याचे कार्यकर्ते लावतील, यात कसलीही शंका नाही,’ असेही शाह म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्बेत सध्या बरी नाही, ती लवकर बरी व्हावी. मात्र, ते जेव्हा चांगले होते तेव्हासुद्धा महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शोधत होती. सत्ता हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तो मिळवणार, असे शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहे,’ असा टोलाही शाह यांनी या वेळी लगावला.

आणखी काय म्हणाले शाह

  • जो काहीही न मागता काम करतो, त्याला सर्व काही मिळते.
  • भारतीय जनसंघाने लावलेल्या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. विचारावर आधारलेली आमची संघटना जगातील सर्वांत शक्तिशाली पक्ष झाला आहे.
  • काँग्रेस सरकारने दहा वर्षांत 12 लाख कोटींचा घोटाळा केला. घोटाळ्यांवर मौनीबाबा काहीच बोलत नव्हते.
  • मौनीबाबाचे सरकार गेल्यानंतर मोदी सरकारने जगात दबदबा निर्माण केला. पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला.
  • राम मंदिरावरून आम्हाला टोमणे मारले जात होते. पण, ज्या जागेवर प्रभू रामाचा जन्म झाला, त्याच जागेवर आता मंदिर उभे राहत आहे. आम्हाला टोमणे मारणारे कुठे गायब आहेत, ते कळतही नाही.
  • कलम 370 हटवून आम्ही भारताच्या डोक्यावर काश्मीरचा मुकुट बसवला आहे.

हेही वाचा

Back to top button