आरटीई सुनावणीसाठी ’तारीख पे तारीख’; न्यायालयीन सुनावणी लांबणीवर
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लाखो पालक आरटीई प्रवेशाची वाट पाहत आहेत. परंतु, आरटीई प्रवेशाच्या सुनावणीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 18) झालेल्या सुनावणीदरम्यान आणखी काही संघटनांनी व शाळांनी आरटीईप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे आरटीईसंदर्भातील पुढील सुनावणी आता येत्या 3 जुलै रोजी घेतली जाणार आहे. परिणामी, पालकांना आरटीई प्रवेशाची जुलै महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील 9 हजार 217 शाळांमधील 1 लाख 5 हजार 399 जागांवरील प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 972 अर्ज आले आहेत. शिक्षण विभागाने प्रवेशाची ऑनलाइन लॉटरी काढली आहे. परंतु या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबवणीवर जात आहे. काही शाळांनी आरटीई 25 टक्के राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. त्यामुळे या शाळांच्या प्रवेशाचे काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात इतरही सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी तीन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.
न्यायालयीन प्रक्रिया इतकी त्रासदायक का?
न्यायालयात 12 जून रोजी सुनावणी होणार होती. पण काही कारणास्तव ही सुनावणी झाली नाही. तसेच 13 जून रोजी सुध्दा काही कारणामुळे सुनावणी होऊ शकली नाही. तर 18 जून रोजी झालेल्या सुनावणीत काही शाळा आणि संघटनांनी नव्याने याचिका दाखल केल्या. त्यावर म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने वेळा दिल्या असून पुढील सुनावणी 3 जुलै रोजी होणार आहे.
अद्याप निर्णय नाही
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात केलेला बदल हा बरोबर आहे. त्यामुळे त्याला देण्यात आलेली स्थगिती उठवावी, अशी एक याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तर काही शाळांनी कायद्यात बदल केल्यानुसार आरटीईच्या आरक्षित जागांवर प्रवेश दिले आहेत. या जागांना संरक्षण द्यावे, अशीही याचिका दाखल झाली आहे. या दोन्ही याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी लागणार आहे. तसेच सध्या थांबलेल्या आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयाने कोणाताही निर्णय दिला नाही. त्यामुळे जुलै महिन्यांपर्यंत पालकांना आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा