शालेय विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका!; मध्यान्ह भोजनात मिळणार चटपटीत पदार्थ

शालेय विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका!; मध्यान्ह भोजनात मिळणार चटपटीत पदार्थ
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या १५ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात तीन संरचित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणीसत्त्व, अंडा पुलाव, तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची त्याच त्या खिचडीपासून सुटका होणार असून, तब्बल १५ पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला.

सद्य:स्थितीत तांदळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहार दिला जात आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढविणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी वृध्दिगत करणे, तसेच आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती.

राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागांतून उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार मिळण्यास मदत होत आहे. या पार्श्वभूमीवर आहारात वैविध्यता आणून तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्त्व यांचा समावेश असलेला तीन संरचित आहार (श्री कोर्स मील) देण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेली मटकीची उसळ, मटार पुलाव, गोड खिचडी, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, मूग, शेवगा, वरण-भात, तांदळाची खीर, चणा पुलाव, नाचणीचे सत्त्व, सोयाबीन पुलाव, मोड आलेले कडधान्य या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना पोषण आहार अनिवार्य

निश्चित केलेल्या पाककृती दरदिवशी एक याप्रमाणे बारा दिवस द्यायच्या आहेत. तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्हातील स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व गरजेनुरूप पाककृती निश्चित करताना तांदूळ, कडधान्य डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. तांदळाच्या प्रमाणानुसार कडधान्य, डाळ, तेल, मीठ, मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा. तसेच, पोषण आहार देणे अनिवार्य आहे. पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदळापासून तांदळाची खीर, शिल्लक राहणारा भाजीपाला आणि मोड आलेली कडधान्यांची कोशिंबीर हे पदार्थ दिल्यास विद्याथ्यांच्या आहारात वैविध्यता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) द्यावीत.

आठवड्यातील चार दिवस दररोज तांदळाची खीर, एक दिवस नाचणीसत्त्व नियमित पाककृतीसोबत द्यावी. अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव द्यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दरमदित केळी अथवा स्थानिक फळ द्यावे. त्या दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्त्व, मोड असलेले कडधान्य (स्प्राउट्स) देण्यात येऊ नयेत, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news