
[author title="सुनील माळी" image="http://"][/author]
नानासाहेब पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले खरे, पण त्यांचे कार्य आणि विचार केवळ पुणे लोकसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिले नाही. कधी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेऊन त्यांनी महाराष्ट्र तोडण्याविरुद्ध यशस्वी आंदोलन केले, कधी तेव्हाच्या अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा, यासाठी झुंज दिली, कधी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेऊन जन्मठेपेच्या शिक्षेसाठी तुरुंगात गेले तर कधी ब्रिटनमधील उच्चायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली… केवळ शहरसेवा करून नव्हे तर देशसेवा करून 'देशगौरवासाठी झिजला…' ही महाराष्ट्रजनांबाबतची पंक्ती त्यांनी खरी करून दाखवली…
मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हिंदळे गावच्या नानासाहेबांनी शिक्षणासाठी पुणे गाठले आणि ते पुणेकरच झाले. पुण्यात बी. ए., एल. एल. बी. चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे सामाजिक कामात पहिले पाऊल पडले ते पर्वतीवरील मंदिराच्या सत्याग्रहात. 'आमची पुण्याची पर्वती' असे आता सर्वच पुणेकर म्हणत असले तरी शंभर वर्षांपूर्वी काही विशिष्ट जातीच्याच लोकांना ती खुली होती. त्यामुळे 1930 च्या दरम्यान अस्पृश्यांना पर्वती मंदिरातील प्रवेशाचा हक्क मिळावा, यासाठी झालेल्या सत्याग्रहात ना. ग. गोरे उर्फ नानासाहेबांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला. त्यानंतर त्यांनी मागे पाहिले नाही.
महाराष्ट्र यूथ लीगचे ते चिटणीस झाले, त्यानंतर 1936 मध्ये त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले. समाजवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा असल्याने समविचारी मंडळींबरोबर त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. नानासाहेबांना 1948 मध्ये समाजवादी पक्षाचे सहचिटणीस करण्यात आले. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण शेकडो संस्थानांबरोबरच गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त करण्यासाठी 1955 मध्ये झालेल्या गोवा मुक्ती संग्रामात नानासाहेबांनी भाग घेतला. त्यांच्या सत्याग्रहामुळे त्यांना पकडण्यात आले आणि चक्क जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तथापि 1957 मध्ये त्यांची सुटका झाली. त्याच काळात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून ती गुजरातमध्ये विलीन करण्याचा कट रचण्यात आला, त्याला महाराष्ट्रवासीयांनी जोरदार विरोध केला.
त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन काळात 1957 मध्ये आलेल्या लोकसभा निवडणुकीत संयु्क्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजासमाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ते उतरले. समितीने उभ्या महाराष्ट्राची लोकभावना चेतवली असल्याने ते निवडून आले आणि खासदार झाले. जे करायचे ते उत्तमच, प्रगल्भतेने करायचे हे त्यांचे धोरण असल्याने या पुणेकर लोकप्रतिनिधीने संसद गाजवली आणि काकासाहेब गाडगीळांचा वारसा आपण जपत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. लोकसभेत निवडून गेल्यावर उत्तम संसदपटू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. बुद्धिप्रामाण्यवादी असल्याने सुस्पष्ट वैचारिक मांडणी हे त्यांच्या वक्तृत्वाचे वैशिष्ट्य होते. चिनी आक्रमणाविरुद्ध लोकसभेत त्यांनी प्रथम आवाज उठवला.
त्यांचा पंडित नेहरू यांच्याशी वैचारिक विरोध होता, पण तरीही त्यांचे पंडितजींवर अफाट प्रेम होते. त्यामुळेच बहुदा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद केला एवढेच नव्हे तर पंडितजींनी आपल्या मुलीला म्हणजेच इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रांच्या 'लेटर्स टु इंदिरा' या संकलनाचे 'इंदिरेस पत्र' या नावाने भाषांतरही त्यांनी केले. नानासाहेबांच्या खासदारकीची मुदत 1962 मध्ये संपली. त्याच दरम्यान ते आधी प्रजासमाजवादी पक्षाचे सरचिटणीस झाले आणि 1964 मध्ये त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. खासदारकीची मुदत संपली, आता त्या खालच्या स्तरावर काम करायचे नाही, असा मानापानाचा प्रश्न नानासाहेबांना पडला नाही, कारण खासदारकीची मुदत संपल्यावर पाच वर्षांनी म्हणजे 1967 मध्ये ते पुण्याचे महापौर झाले. ती जबाबदारी जशी त्यांनी सहजरित्या सांभाळली तसेच 1970 पासून पुन्हा खासदार म्हणून त्यांनी त्याच सहजपणे काम करण्यास सुरुवात केली. या वेळी ते लोकसभेचे सदस्य झाले नाहीत, तर राज्यसभेचे सदस्य झाले.
पुण्याच्या या एकेकाळच्या खासदाराने उत्तम साहित्यिक म्हणूनही नावलौकिक मिळवला. 'समाजवादाचा ओनामा' हे त्यांचे पहिले पुस्तक. जुन्या हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर 1942 पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी 'कारागृहाच्या भिंती' या पुस्तकात आहे. नानासाहेबांमधील ललित लेखक आपल्याला 'डाली' या निबंधसंग्रहात तसेच 'शंख आणि शिंपले' या पुस्तकात जसा सापडतो तसाच तो 'सीतेचे पोहे', 'गुलबशी' या कथासंग्रहात दिसतो. त्यांच्या वैचारिक लेखनात 'आव्हान आणि आवाहन', 'ऐरणीवरील प्रश्न' आदींची नावे घ्यावी लागतील.
कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी अनुवाद केला आहे. त्यांच्या बालसाहित्यामध्ये 'बेडूकवाडी', आणि 'चिमुताई घर बांधतात' यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यांच्या 'विश्वकुटुंबवाद' म्हणजेच साम्यवाद, 'अमेरिकन संघराज्याचा इतिहास' आदी ग्रंथांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल. या त्यांच्या साहित्यिक कामगिरीमुळेच त्यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही निवड झाली होती आणि ते कामही त्यांनी उत्तमरीत्या सांभाळले. नानासाहेबांनी समाजवाद, समाजसुधारणा हे विचार नुसते बोलण्यापुरते ठेवले नाही तर स्वत:च्या जीवनात त्याचे अनुकरणही केले. त्यांनी स्वत: एका विधवेशी विवाह केला, ही बाबही उल्लेखनीय म्हणावी लागेल.
हेही वाचा