खडकवासला : 1952 साली पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने सर्व गावकर्यांत चैतन्य होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी त्या वेळी ताज्या होत्या. देशात लोकशाही राजवट सुरू होत असल्याने आम्ही आनंदी होतो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मी सहभाग घेतला होता. महात्मा गांधी यांची जानेवारी 1945 मध्ये खडकवासल्यामध्ये सभा झाली होती. त्या वेळी जनजागृतीसाठी मी आघाडीवर होतो. 1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंतच्या सर्व 16 लोकसभा निवडणुकीत मी हिरिरीने सहभाग घेत मतदान केले आहे, असे स्फूर्ती चेतवणारे अनुभव सांगताना सिंहगड रस्त्यावरील नांदेडमधील शतायुषी वॉरिअर्स म्हणजेच तब्बल 102 वर्षे वयाचे मतदार निवृत्ती दारवटकर हे अक्षरश: भारावून गेले होते.
1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव सांगताना निवृत्ती दारवटकर म्हणाले, त्यावेळचे सहकारी आज हयात नाहीत. पुणे लोकसभा मतदारसंघात नांदेड, पश्चिम हवेलीचा भाग होता. काँग्रेसकडून नरहरी गाडगीळ उभे होते. गाडगीळ यांच्या प्रचारात मी आघाडीवर होतो, असेही त्यांनी सांगितले. येत्या 7 मे रोजी होणार्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवृत्ती दारवटकर हे सज्ज झाले आहेत. सध्या त्यांचे वय 102 वर्षे आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड, खडकवासला, सिंहगड भागात क्वचित या वयाचे वृद्ध मतदार आहेत. तरुणांनाही लाजवेल, अशी जिद्द उराशी बाळगून निवृत्ती दारवटकर हे मतदानाची प्रतीक्षा करत आहेत. निवृत्ती दारवटकर यांचा जन्म 19 मे 1923 सिंहगड रस्त्यावरील नांदेडमध्ये झाला.
कुस्ती क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमावले आहे. दारवटकर यांचे शिक्षण तिसरीपर्यंत झाले आहे. ते आजही मोडी लिपीत लिहितात तसेच वाचतात. जन्मापासून ते माळकरी आहेत. ते रोज सकाळी देवपूजा, हरिनाम जप केल्यानंतर ते सरबत पाणी घेतात. गेल्या 25 वर्षांपासून दही व भात असा त्यांचा आहार आहे. वाढत्या वयाबरोबर शरीर क्षीण होत चालले आहे. मात्र, कोणताही आधार न घेता ते चालतात. खुर्चीवर बसून समोरच्या व्यक्तीशी बोलतात. त्यांना दशरथ व किसन अशी दोन मुले व पाच मुली आहेत. निवृत्ती दारवटकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती करत चिंच,आंबा, पेरू अशा फळांचा व्यवसाय केला. फळांचे व्यापारी म्हणून ते महात्मा फुले मंडई, मार्केट यार्डात आजही प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा