
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाळांना उन्हाळी सुटी लागल्यामुळे मुलांनी मोबाईलच्या विश्वापासून दूर राहून अवांतर वाचन करावे आणि वृत्तपत्रांचे वाचन करावे, या सकारात्मक उद्देशाने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाकडून अनोखा वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलांनी वृत्तपत्राचे वाचन करून आणि लेखन करावे, याचे महत्त्व पालकांसह मुलांना पटवून देण्यात येत आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणजे मुले वृत्तपत्रांचे दररोज वाचन करीत असून, या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला पालकांसह मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोज सकाळी उठून मुले वृत्तपत्रांचे वाचन करून त्याबद्दल लेखनही करीत आहेत.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव जीवन भोसले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.
विजय पारगे म्हणाले, वृत्तपत्रवाचन व अवांतर वाचन करायला लावणे व मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा अनोखा उपक्रम आहे. पालक जे शिकवतात ते मुले आत्मसात करतात. आपली मुले प्रेमाशिवाय आणि काळजीशिवाय शिकू शकणार नाहीत, हे लक्षात घेऊन एप्रिल- मे महिन्याच्या सुटीतील अनोखा उपक्रम हाती. घेतला असून, वर्तमानपत्र वाचन व लेखनाचे महत्त्व पटवून देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्या मुलाचे वाचनकौशल्य देखील सुधारण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
हेही वाचा