ओतूर : पुढारी वृत्तसेवा : सद्य:स्थितीत ग्रामीण भागात गावोगाव यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू आहे. ग्रामदैवत देवी-देवतांच्या यात्रेच्या परंपरेनुसार धार्मिक विधीसोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सोबतच यंदा लोकसभेच्या निवडणुकीचे वारे असल्याने नेते, पुढारी यात्रा-जत्रांना भेट देऊन प्रचार यंत्रणा राबवीत आहेत. मात्र, या सर्व धामधुमीत अनेक गावांत तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न 'आ' वासून उभा आहे. त्याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे. बहुतांश गावांमधून पशुपक्षी, जनावरे तहानलेली असून, गावकर्यांना देखील पिण्याचे व रोजच्या वापरासाठी लागणारे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. आदिवासी पट्ट्यातील महिला भगिनी हजारो फूट डोंगरखोरे उतरून एक हंडा पाणी जमवून व डोईवर घेऊन पुन्हा तितकेच कष्ट घेत घरी येताना दिसत आहेत. त्यातच शेतीक्षेत्र उघडे-बोडके झालेले पाहताना मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत.
उत्तर पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये ओढे, नाले, नद्या, विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत, तर धरण क्षेत्रांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. ही आजची पाण्याची भीषणता पाहता गावोगावच्या यात्रेतील तमाशातील गाणी व निवडणुकीची फिरत्या गाडीवर भोंग्यातून वाजत असलेली गाणी तितकीशी समाधान देत नाहीत. त्यात शेतमालाचे पडलेले बाजारभाव, पिकांचे कमी गळीत अन् बिबट्यांची दहशत शेतकर्यांच्या पाचवीला पुजलेली दिसते. परिणामी, मतदारांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील भीषण पाणीटंचाईवर गाजणार आहे. अणे पठार भाग, पिंपरी पेंढार, गामुखवाडी, खामुंडी, डुंबरवाडी, कोपरे, मांडवे, पुताचीवाडी, जांभुळशी आदी गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
उपरोक्त काही गावांना पिंपळगावजोगा व चिल्हेवाडी धरण कालव्यापासून टाळण्यात आल्याने तेथे दुष्काळाला जाणीवपूर्वक आमंत्रण दिल्यासारखेच आहे. ज्या भागांत नागरिक पाण्यासाठी टाहो फोडीत आहेत, त्या भागांतील पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार्या उमेदवाराच्या पाठीशी मतदारराजा उभा राहणार हे अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे. केवळ गाणी वाजवून पाणी मिळणार का? असा खडा सवाल शेतकरी करू लागले आहेत. अद्याप पाऊस सुरू व्हायला दोन महिने बाकी आहेत. पिण्याचे पाणी कोण व कसे देणार, याचे उत्तर मतदारराजाला अपेक्षित आहे.
हेही वाचा