पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागातील खासगीकरण हळूहळू पाय पसरत आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण आरोग्य विभागाकडून कायम पुढे केले जाते. दुसरीकडे, मंजूर पदांपैकी निम्मी पदे भरलीच नसल्याचे महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याने दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, प्रसूतिगृहे, तसेच इतर दवाखान्यांमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय कौशल्ये वापरण्याच्या संधी नसल्याने आणि पायाभूत सुविधांच्या मर्यादेमुळे डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महापालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आरोग्य विभागातील 2,067 मंजूर पदांपैकी, 986 सध्या रिक्त आहेत. यामध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 पदांचा समावेश आहे. रिक्त पदांमुळे रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येतात. तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे रुग्णांना ससून रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.
हेही वाचा