पुण्यातील रेस्क्यू कॅम्पमधून तीन बिबटे शहापुरात रवाना | पुढारी

पुण्यातील रेस्क्यू कॅम्पमधून तीन बिबटे शहापुरात रवाना

डोळखांब : दिनेश कांबळे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील वन्यजीव संग्रहालयातून तिन बिबट्यांना घाटघरमार्गे शहापूर तालुक्यातील चोंढे परिसरात सोडल्याची माहिती मिळाली असून याला वनविभागाकडून दुजोरा मिळाला आहे.

शहापूर तालुका हा अतिदुर्गम व डोंगराळ तालुका असुन याठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. या भागात आता 10 ते 12 बिबट्यांचा वावर असणार आहे.

तालुक्यातील डोळखांब, चोंढे, तानसा, खर्डी, सारंगपूरी, जांभे धरण याठिकाणी तसेच शहापूर व मुरबाड तालुक्याच्या सरहद्दीवर असणार्‍या आणी डोळखांबपासुन जवळच असणार्‍या मुरबाड तालुक्यातील शिरोशी गावा परिसरात बिबटे आढळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या आधी 8 ते 9 बिबट्यांचा वावर होता त्यातच पुणे विभागातून हे तिन बिबटे सोडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यापासुन जंगल संरक्षणासाठी फायदा होत असला तरी जंगल विरळ होत असल्याने तसेच विविध प्रकल्पाचे कामासाठी करण्यात येणार्‍या स्फोटामुळे बिबटे मानववस्तीकडे वळत आहेत.

हे बिबटे नरभक्षक नसले तरी मनुष्यांकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला तर ते माणसावर हल्ला करू शकतात. मानवी वस्तीतील कोंबडी, बकरी, इतर जनावरे, शिकारीची कुत्री यांची शिकार ते घरात घुसुन करू शकतात. यासाठी वनविभागाकडून जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.

Back to top button