बेकायदा ग्रामपंचायत नोकर भरतीची चौकशी करा : खासदार गिरीश बापट | पुढारी

बेकायदा ग्रामपंचायत नोकर भरतीची चौकशी करा : खासदार गिरीश बापट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी हवेली व मुळशी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 1100 कर्मचार्‍यांची बेकायदा भरती झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.

शहराच्या लगत असलेल्या गावांत नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे 21 गावांचा समावेश 18 डिसेंबर 2020 रोजी महापालिकेत करण्यात आली. ही गावे महापालिकेत समाविष्ट होणार असल्याने ग्रामपंचायतींनी नोकर भरती केली आहे; परंतु ही भरती बेकायदा असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. यासंदर्भात माध्यमांतून वृत्त प्रसिद्ध होत आहे. या बेकायदा नोकर भरतीमुळे सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात तीव्र भावना आहेत.

ज्या अधिकार्‍यांनी ही नोकर भरती केली आहे, त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणीही गिरीश बापट यांनी केली आहे. दरम्यान, चौकशी समितीला लागलेल्या विलंबामुळे जे कर्मचारी अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचेही वेतन दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचलं का?

 

Back to top button