बारामती : टॅटूवरून पोलिसांनी लावला बलात्काऱ्याचा शोध

बारामती शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयिताला अटक केली.

बारामती शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयिताला अटक केली.

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करत तिला गरोदर ठेवणाऱ्या आरोपीच्या शोधाचे मोठे आव्हान शहर पोलिसांपुढे होते. विशेष म्हणजे पिडितेलाही त्याचे नाव माहित नव्हते. परंतु त्याने हातावर गोंदवल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. सलिम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ (वय २५, रा. गोजूबावी, ता. बारामती, मूळ रा. लक्ष्मीनारायणनगर, कसबा, बारामती) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी यासंबंधीची अधिक माहिती दिली. २५ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयामधील कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याने यासंबंधीची खबर शहर पोलिस ठाण्याला दिली होती. बारामतीतील पिडीत मुलगी गरोदर असून ती उपचारासाठी दाखल असल्याचे कळविण्यात आले.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेत महाडीक यांनी उपनिरीक्षक गणेश पाटील, हवालदार कोठे, कांबळे, चव्हाण यांना ससून रुग्णालयात पाठवले. पिडीतेने त्यांना सांगितले की, ती मोरगाव रस्त्याने एका शाळेत जात असताना तिची संशयिताबरोबर ओळख झाली. दोन-तीनदा भेटल्यानंतर त्याने तिला फूस लावत अमिष दाखवले. त्यातून त्याने कालव्यालगत नेत तिच्यावर तीन, चारदा बलात्कार केला. तिची मासिक पाळी चुकल्याने आईने तिला विश्वासात घेत चौकशी केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. परंतु समाजात बदनामी होईल या भितीने आईने तिला ससून रुग्णालयात दाखल केले.

तेथे कर्तव्यावर असणाऱया पोलिसांमुळे शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्याकडे संशयितासंबंधी चौकशी केली. परंतु तिला त्याचे नावही माहिती नव्हते. केवळ त्याने हातावर गोंदवत सागर असे नाव लिहिले असल्याचे तिने सांगितले. तिच्या जबाबावरून पोलिसांनी बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करत संशयिताचा शोध सुरु केला. तिने केलेल्या वर्णनावरून सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ या संशयिताला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्‍ह्याची कबुली दिली.

पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाघमोडे, तुषार चव्हाण, मनोज पवार, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, बंडू कोठे यांनी संशयिताला जेरबंद करण्याची कामगिरी केली.

हेही वाचलं का?

Exit mobile version