पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकार्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला जाईल, असे जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे. लोसकभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी (दि.27) दुपारी काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. विविध नेत्यांनी व पदाधिकार्यांनी या वेळी नियोजनासंदर्भात या वेळी आपली मते मांडली.
या वेळी शिवसेनेच्या एका पदाधिकार्याने आम्ही लोकसभेचे काम करू मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कसब्याची जागा शिवसेनेला सोडून असा शब्द द्या, अशी मागणी केली. त्यावर काही नेत्यांनी पुढाकार घेत, विधानसभेला अजून उशीर आहे. ही निवडणूक होऊ द्या, त्यानंतर बसून यावर बोलू, असे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, या वेळी विधानसभा निहाय निवडणूक कचेरी टाकणे, शहर व विधानसभा निहाय समन्वय समिती तयार करणे, 29 मार्च रोजी इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दांचा समावेश असावा, महाविकास आघाडीचे विधानसभा निहाय निरीक्षक नेमणे तसेच निवडणुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे, या विषयांवर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा