प्रगती पुस्तकासोबत शाळेचा दाखलाही देणार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या पाल्यांचे वर्ष पूर्ण होताच प्रगती पुस्तकासोबत शाळा सोडल्याचा दाखलाही देणार असल्याचे पत्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पत्रामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांची फी भरण्यासाठी तयार असताना शाळेमार्फत आठवीतील 40 विद्यार्थ्यांना काढण्यात आलेल्या पत्रामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली असून, शाळेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते राजेश बेल्हेकर म्हणाले, महर्षीनगर परिसरातील 40 पालकांनी आरटीई कायद्यातील तरतुदींनुसार सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
2013 मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना आठवीपर्यंत या शाळेत मोफत शिक्षण मिळत आले आहे. मात्र, पुढील शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत सवलती लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकांनी शाळेचे शुल्क भरण्याची तयारी दर्शविली. मात्र, तरीही शाळेने त्यास नकार देत पुरुष व महिला बाऊन्सर्समार्फत पालकांवर दबाव आणला जात असल्याचे नमूद केले. दरम्यान, शाळेमार्फत घडलेल्या या प्रकाराबाबत शिक्षण आयुक्तांसह शिक्षण संचालक व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून शाळेवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केल्याचे योगेश पवार यांनी नमूद केले. याबाबत, शाळेच्या मुख्याध्यापिका वैजयंती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
हेही वाचा