चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. चाकण शहर आणि लगतच्या औद्योगिक आणि ग्रामीण रहिवासी भागात अलीकडेच तीन बिबटे पकडण्यात आले. चाकण पालिका हद्दीत राक्षेवाडी परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याने आणि मागील दोन दिवसांमध्ये धनगर बांधवांच्या वासरू आणि घोडीवर लागोपाठ दोन दिवस हल्ले करून ठार केले. तत्पूर्वी राक्षेवाडीजवळील
आगरवाडी भागात 10 शेळ्या ठार केल्या होत्या. चाकण परिसरातील राक्षेवाडी-आगरवाडी भागातील नागरिकांमध्ये भीती आहे. वन विभागाने त्वरित बिबट्याला पकडावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
चाकण परिसरात बिबट्याचा हल्ला होण्याच्या व दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. राक्षेवाडी भागात बिबट्याचे शेतकर्यांना वारंवार दर्शन होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राक्षेवाडी लागाचा डोंगराभोवतीच्या भागात अनेकवेळा बिबट्याने पाळीव जनावरे ठार केली आहेत. मागील पंधरवड्यात आगरवाडी येथे एका वस्तीवरील 10 शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या, रानातील वस्तीवर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. मागील काही महिन्यांत या परिसरात किमान महिन्यातून एकदा किंवा दोनदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समीकरणच झाले आहे. चाकणलगतच्या परिसरात बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत नसल्याचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. रात्रीच्या सुमारास लहान मुलांना घराबाहेर पाठवू नये आणि एकट्याने बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
एकीकडे गावांच्या हद्दी विस्तारत असल्याने ऊस, मका यांसारख्या पिकांच्या क्षेत्रात मिळणारी लपण कमी झाल्याने निवाऱ्यासाठी मानवी वस्तीकडे हे बिबटे धाव घेत आहेत. याशिवाय शेतीच्या परिसरातील पाळीव प्राणी, कुत्री यांसारख्या प्राण्यांमुळे त्यांच्या भक्ष्याचीही सोय होत असल्याने बिबटे या परिसरात ठाण मांडून आहेत. खेड तालुक्यात घनदाट वनसंपदा असलेला पश्चिम भाग सोडून बिबट्याचे अनेकदा शहरे आणि लोकवस्तीच्या भागात 'दर्शन' दिले आहे. पाळीव जनावरांवर हल्ल्यानंतर तातडीने नुकसानभरपाई दिली जात नसल्याचा पशुपालक शेतकर्यांचा आरोप आहे. लोकवस्त्यांच्या भागात लावण्यात आलेल्या पिंजर्याला हुलकावणी देत बिबट्यांचा या भागात मोठा वावर वाढला आहे.
हेही वाचा