पुणे : पहिला डोस चार दिवसात शंभर टक्‍के पूर्ण करा : जिल्‍हाधिकाऱ्यांचे आदेश | पुढारी

पुणे : पहिला डोस चार दिवसात शंभर टक्‍के पूर्ण करा : जिल्‍हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

अद्यापही पुणे ग्रामीण व नगरपालिका भागातील बर्‍याचशा पात्र लाभार्थ्यांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस व दुसरा डोस प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरवा करून देखील लसीकरणाच्या कामकाजाचा वेग कमी होणे ही बाब अत्यंत खेदाची बाब असल्याची खंत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केली. पुढील चार दिवसांत म्हणजेच मंगळवार (दि.30) पर्यंत पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये पहिल्या डोसचे लसीकरण 96.07 टक्के एवढे तर दुसर्‍या डोसचे प्रमाण 57.03 टक्के एवढे आहे. मुबलक प्रमाणात लससाठा शिल्लक आहे. असे असताना देखील पात्र लाभार्थ्यांना लसीचा डोस देणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका भागातील सर्व पात्र पहिल्या डोस लाभार्थ्यांचे शंभर टक्के डोस तर पात्र दुसर्‍या डोसच्या लाभार्थ्यांचे लसीकरण मंगळवार पर्यंत पूर्ण करण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत पहिल्या व दुसर्‍या डोसचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणे अंत्यत आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या हर घर दस्तक मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शंभर टक्के लसीरणाबरोबरच गृहभेटीद्वारे सर्वेक्षण विशेष अभियान राबविण्यात यावे. तसेच सोमवार (दि.29) आणि मंगळवार (दि.30) या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात कोविड लसीकरण केंद्राचे आयोजन करून शिल्लक लाभार्थ्यांना लसीकरण करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

तर प्रशासकीय कारवाईला जावे लागणार सामोरे…

हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत एकही पात्र लाभार्थी कोविड लसीकरणापासून दि.1 डिसेंबरनंतर वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या उपरोक्त शिल्लक लाभार्थ्यांपैकी कोविड लसीकरणापासून लाभार्थी वंचित राहिल्यास त्या गावचे ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी आणि सर्व शासकीय यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येईल.

त्यांच्याविरूद्ध साथरोग नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशा कडक इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

Back to top button