बारामती : पोलीसांच्या भीतीने नदीत उडी, संतप्त जमावाचा उपमुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या  - पुढारी

बारामती : पोलीसांच्या भीतीने नदीत उडी, संतप्त जमावाचा उपमुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या 

बारामती; पुढारी वृत्तसेवा 

पोलिसांच्या भीतीमुळे निरा नदीच्या पाण्यात उडी टाकल्याने दम लागून मृत्यूमुखी पडलेल्या मंगलेश भोसले याच्या मृत्यूनंतर त्याच्या वस्तीवरील जमाव कमालीचा संतप्त झाला आहे.

या जमावाने शुक्रवारी रात्री उशीरा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भिगवण रस्त्यावरील सहयोग सोसायटी निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला आहे. सुमारे शंभरहून अधिक जणांचा जमाव येथे जमला आहे. अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. सहयोग सोसायटीबाहेर तणावाचे वातावरण आहे.

मंगलेश भोसले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी या जमावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मंगलेश हा शेळी चारण्यासाठी गेला होता. पोलिसानी दारु विकत असल्याच्या कारणावरुन मारहाण सुरु केल्याने त्यांच्या भितीपोटी मंगलेश याने जीव वाचवण्यासाठी नदी पात्रात उडी टाकून पळण्याचा प्रयत्न केल्याचे सहयोगबाहेर जमलेल्या जमावाने सांगितले. या प्रकरणी संबधित पोलिसांवर खूनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका जमावाने घेतली आहे.

दरम्यान शहर पोलिसांनी या जमावाला येथून पांगवले. त्यानंतर रात्री उशीरा त्यांनी येथून आम्ही जात  तालुका पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या देणार असल्याचे सांगितले. मंगलेश याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुई ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून तेथेही पोलिस फौजफाटा तैनात आहे.

Back to top button