शिवभक्तांना आवश्यक सुविधा द्या : जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

शिवभक्तांना आवश्यक सुविधा द्या : जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : किल्ले शिवनेरीवर शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. शिवजयंती उत्साहात साजरी करत असतानाच येणार्‍या शिवभक्तांना कोणत्याही असुविधांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याची व्यवस्था करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जुन्नर पंचायत समितीमध्ये शिवजयंती आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उप वन संरक्षक अमोल सातपुते, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशा बुचके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार, गृहरक्षक दलाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे आदी उपस्थित होते.

शिवजयंती हा आनंद उत्सव असून त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, महसूल, पोलिस विभाग, वन विभाग तसेच अन्य विभागांची यात मोठी भूमिका आहे. यासह अन्य सर्वच यंत्रणांनी या उत्सवाचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे व्हावे, यासाठी समन्वयाने काम करावे. सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात यावी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, मेगाफोन देण्यात येतील. हा उत्सव हरित असावा म्हणून प्लास्टिक नियंत्रण करावे तसेच कचरा जमा करण्याची व विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करा, असेही त्यांनी सांगितले.

गर्दी नियंत्रणासाठी मुख्य सभेचे ठिकाण बदलण्याविषयी भारतीय पुरातत्व विभागासोबत (एएसआय) चर्चा सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, शिवजन्म स्थळ तसेच शिवकुंजची सजावट, रोषणाई, पायथा ते श्रीदत्त मंदिरापर्यंत पथदिव्यांसाठी वीज व्यवस्था चांगल्याप्रकारे करावी. गडावर तसेच तसेच दत्त मंदिर आणि पायथ्यासह शहरातही स्वच्छतागृहे आणि इतर स्वच्छताविषयक चांगले व्यवस्थापन करावे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या दुर्गोत्सवातील बचत गट आणि अन्य स्टॉल, टेन्ट सिटी, जाणता राजा महानाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदींबाबत माहिती, प्रसिद्धी करावी असेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी. चव्हाण, डॉ. पंकज देशमुख यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news