पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठी नाट्यरसिक असेपर्यंत मराठी नाटक संपणार नाही. त्यामुळे मराठी नाटक टिकेल की नाही याची चिंता करू नका. मुकपट, बोलपट, टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानंतरही नाटक संपलेले नाही. नाट्य चळवळीसाठी आवश्यक पाठबळ राज्य सरकारकडून दिले जाईल. सध्या लोककला केवळ शोकेससाठी वापरतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोककलांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र कार्यक्रम तयार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 7) स्पष्ट केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी फडणवीस बोलत होते.
त्या प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, लेखक प्रा. मिलिंद जोशी, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, आयुक्त शेखर सिंह, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उद्योजक राजेश सांकला, कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मधु जोशी, वसंत अवसरीकर यांच्यासह 25 कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
मंत्रालयात फाईलचे सिझेरियन करावे लागते
नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी नाट्य चळवळीशी संबंधित विविध मागण्या मंत्रालयात रेंगाळतात, अशी खंत संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी त्यांच्या मनोगतामध्ये मांडली होती. हाच धागा पकडत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जब्बार पटेल यांचे सरकारी व्यवस्थेबाबत मन कलुषित झाले आहे. मंत्रालयात फाईलची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही तेथे सिझेरियन करावे लागते, हे त्यांनी लक्षात घ्यावे. महाराष्ट्रात इतके नाट्यरसिक बनावे की अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याची नव्हे तर दुप्पट करा, अशी मागणी करण्याची वेळ यावी. नाट्य चळवळीला पाठबळ देण्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे नाट्य कलावंतांच्या पाठीशी राहील.
भाडेवाढ केली कमी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण
मोरे प्रेक्षागृहात नाटकांसाठी जादा भाडे आकारले जात असल्याबाबत नाट्यसंमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या तासाभरात आयुक्तांनी भाडेवाढ कमी केली, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आवर्जून
नमुद केले. नरेश गडेकर यांनी आभार मानले.
सनदी अधिकारी विलंबित तालात
नाटकांशी संबंधित काही मागण्या घेऊन मंत्रालयात गेल्यानंतर सनदी अधिकारी हे विलंबित तालात काम करतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मध्यम लयीतील आहेत. त्यांनी आदेश देताना द्रुत लयीत द्यावी. म्हणजे, आमच्या मागण्या रेंगाळणार नाही, असे मत संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. पाचवी ते दहावीच्या मुलांना सांगितिक जाण यावी, यासाठी त्यांना लहान वयातच त्याविषयी प्राथमिक शिक्षण द्यायला हवे. नाट्यसंमेलन कन्नड, केरळ, बंगाली रंगभूमी यांंनाशी समाविष्ट करुन घ्यावे. म्हणजे, भारतीय चित्र निर्माण होईल. नाट्यसंमेलनात फ्रेंच, जर्मन अशा भाषांतील दोन नाटकांचा समावेश करावा.