पोलिस शिपायाला टास्कच्या आमिषाने पाच लाखांचा गंडा
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिस दलातील एका पोलिस शिपायाचीच ऑनलाइन टास्कच्या आमिषाने पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका पोलिस शिपायाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस शिपायाने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार पोलिस शिपाई शिवाजीनगर पोलिस वसाहतीत राहायला आहे.
सायबर चोरट्यांनी पोलिस शिपायाच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. सोशल मीडियातील जाहिराती, तसेच मजकुरास दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल. मोबाइलवरून हे काम करता येणे शक्य आहे, असे सांगून चोरट्यांनी पोलिस शिपायाला जाळ्यात ओढले. पोलिस शिपायाला सुरुवातीला काम देण्यात आले. पोलिस शिपायाने काम पूर्ण केल्यानंतर त्याला चोरट्यांनी परतावा दिला. त्यानंतर पोलिस शिपायाला गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले.
ऑनलाइन कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी पोलिस शिपायाकडून वेळोवेळी 4 लाख 99 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस शिपायाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विक्रम गौड तपास करत आहेत.
हेही वाचा