नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत ; सगळीकडे सेलिब्रेशनचा मूड

नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत ; सगळीकडे सेलिब्रेशनचा मूड

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'हर्ष नवे, पर्व नवे… नवी उमेद जीवनाची… दूर सारूनी कटू आठवणी करूया सुरुवात नववर्षाची…' अशा नव्या ऊर्जेने अन् नव्या चैतन्याने रविवारी रात्री बारा वाजता 2024 या नववर्षाचे पुणेकरांनी जल्लोषी स्वागत केले. 2023 या सरत्या वर्षाला निरोप देत आपल्या कुटुंबासमवेत तरुण-तरुणींनी आनंदोत्सव साजरा केला. सगळीकडे न्यू इअर सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला अन् पार्टी करत 'हॅपी न्यू इअर' म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ऐन थंडीत 'सेलिब्रेशन विथ फॅमिली अ‍ॅण्ड फ्रेंड्स' असा रंग सगळीकडे बहरला. सरत्या वर्षाला निरोप देत अनेकांनी नव्या वर्षाचे स्वागत आनंदात, हर्षोल्हासात केले.

अनेकांनी आप्तेष्टांना आणि मित्र-मैत्रिणींवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. कुटुंबीयांसोबतची नव्या वर्षाची सुरुवात प्रत्येकासाठी खास ठरली. बारा वाजता हातात फुगे घेऊन अन 'हॅपी न्यू इअर' म्हणत दिसणारा तरुणाईचा जल्लोष सगळीकडे रंगला होता. हॉटेल्स, रेस्टॉरंट, क्लब हाउस आणि पबमध्ये पार्टींचे आयोजन केले होते. लोकांनी संगीताच्या तालावर नाचत पार्टीचा आनंद घेतला. तर काहींनी मांसाहारी- शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेत पार्टी एन्जॉय केली.

मध्यवर्ती पेठांसह डेक्कन परिसर, कोथरूड, हिंजवडी, खराडी, विमाननगर, बावधन, औंध, बाणेर आदी ठिकाणीसेलिब्रेशन पाहायला मिळाले. मॉलमध्येही नवीन वर्षाच्या स्वागताचा रंग चढला होता, विद्युतरोषणाईने आणि आकर्षक सजावटीने प्रत्येकाचे लक्ष वेधले. बर्‍याच पुणेकरांनी शहराच्या जवळ असलेल्या फार्म हाउस, विकेंड होम्स, मित्र आणि नातेवाइकांकडे जाऊन न्यू इअर पार्टी केल्याचे पाहायला मिळाले. तर काहींनी घरीच 'हाउस पार्टी' करत नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. केक कापून…बिर्याणीचा आस्वाद घेत आणि एकमेकांना शुभेच्छा देत अनेकांनी 2024 चे सेलिब्रेशन केले. मावळत्या वर्षाच्या कटू आठवणी सोबत न घेता ठरावीक चांगल्या आठवणी घेऊन नव्या वर्षाचे संकल्प आणि आनंद साजरे करून प्रत्येकाने सेलिब—ेशनचा पुरेपूर आनंद घेतला. रात्री ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्तही पाहायला मिळाला. चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त होता. तर दुसरीकडे सोसायट्यांमध्येही 'सोसायटी पार्टी'चे आयोजन करण्यात आले. नवीन वर्षाच्या स्वागताचा जोश रात्रीपर्यंत सुरू होता. एकूणच पुणेकरांनी न्यू इअरचे स्वागत जल्लोषात आणि उत्साहात केले.

रस्तोरस्ती सेलिब्रेशन मूड
शहरातील महात्मा गांधी रस्ता (कॅम्प), कोरेगाव पार्क, डेक्कन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता आदी ठिकाणी दरवर्षी बारा वाजता रंगणारे सेलिब्रेशनपाहायला मिळाले. खासकरून फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि डेक्कन परिसरात तरुणाईने गर्दी केली. विद्युतरोषणाईने हे रस्ते उजळले होते. तसेच, हातात फुगे घेऊन आणि वेगवेगळ्या थीमनुसार पेहराव करत तरुणाईने बाराचा ठोका होताच, सेलिब्रेशनला सुरुवात झाली. येथील रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्येही गर्दी पाहायला मिळाली. बाराच्या ठोक्यावर एकच जल्लोष करत तरुणाईने एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. रस्त्यांवर आणि हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

सोशल मीडियावरही नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव अन् छायाचित्रे….फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टि्वटर सारख्या सोशल माध्यमावरही सेलिब्रेशन आणि शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. एकमेकांना शुभेच्छा देत नेटिझन्संनी 'न्यू इअर'चे स्वागत केले. छायाचित्रे आणि सेल्फी शेअर करत तरुण-तरुणींनी आपले सेलिब्रेशन मूडस शेअर केले. सोशल मीडियावरही सेलिब्रेशनअनोख्या पद्धतीने रंगलेले पाहायला मिळाले.

पुण्यातील लोकांनी प्रामुख्याने कोकण, गोव्याचा समुद्र किनारा, मुंबई आदी ठिकाणी जाऊन पार्टीचा आनंद लुटला. तर काहींनी महाबळेश्वर, वाई, लोणावळा, पानशेत, मुळशी, खडकवासला, भोर, खंडाळा आदी ठिकाणी असलेल्या फार्म हाउस, विकेंड होम्स येथे पार्टीचा आनंद घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news