पुणे : पुढारी वृत्तसेवा : रात्री अकरा वाजता ड्युटी संपवून घरी जाताना गुंडांना भिडून एका जखमी तरुणाचे प्राण वाचविणार्या महिला पोलिस हवालदार सीमा वळवी यांच्या कर्तव्यतत्परतेची दखल घेत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तालयात वळवी यांचा जाहीर सत्कार करून त्यांना शाबासकी दिली. दैनिक 'पुढारी'ने 'गर्दी बघत होती… ती गुंडांशी भिडत होती' या मथळ्याखाली शुक्रवारी (दि. 29) वृत्त प्रसिद्ध करून या घटनेचा थरार मांडला होता.
त्याचीच दखल घेत दस्तुरखुद्द पोलिस आयुक्तांनी वळवी यांना पोलिस आयुक्तालयात बोलावून घेऊन सत्कार केला. या वेळी सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संभाजी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गजानन पवार आदी उपस्थित होते.
24 डिसेंबर रोजी रात्री ड्युटी संपवून पोलिस हवालदार वळवी घरी निघाल्या होत्या. आनंद पार्क रस्त्यावर काही जण एकमेकांसोबत वाद घालत होते. त्यांना वळवी समजावून सांगत होत्या.
त्या वेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. प्रसंगावधान राखत वळवी यांनी कोयत्याने वार करणार्या आरोपीला प्रतिकार करून जखमी तरुणाची सुटका केली तसेच एकाला पकडून ठेवले. याबाबत त्यांनी पोलिस नियंत्रण कक्ष आणि चंदननगर पोलिस ठाण्याला माहिती दिली. तत्काळ पथकाने घटनास्थळी दाखल होत अवघ्या वीस मिनिटांत पाच आरोपींना ताब्यात घेतले. वळवी यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे जखमी तरुणाचे प्राण तर वाचलेच; पण आरोपीदेखील गजाआड झाले.
हेही वाचा