पुणे : पुढारी वृत्तसेवा : संक्रांतीला जीवघेण्या नायलॉन मांजामुळे गंभीर स्वरूपाच्या दुर्घटना घडल्या आहे. पंधरा ते वीस दिवसांवर संक्रांत येऊन ठेपलेली असताना बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणार्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी धनकवडी भागातून अटक केली. वेदांत राकेश गाढवे (वय 19, रा. शंकरमहाराज वसाहत, चव्हाणनगर, धनकवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 5, 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाढवे एका महाविद्यालयात शिक्षण घेतो.
तो बेकायदा नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती सहकारनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. पुणे-सातारा रस्त्यावर पंचवटी सोसायटीच्या परिसरात पोत्यात नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी आला होता. पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेऊन गाढवेला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या पोत्याची तपासणी केली. तेव्हा पोत्यात चार हजार 400 रुपयांचा नायलॉन मांजा आढळून आला.
पोलिस उपायु्क्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गु्न्हे शाखेचे निरीक्षक संदीप देशमाने, उपनिरीक्षक राहुल खंडाळे, बापू खुटवड, अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, भुजंग इंगळे, नीलेश शिवतरे, सागर सुतकर, बजरंग पवार यांनी ही कारवाई केली.
नायलॉन मांजामुळे भोसरीतील उड्डाणपुलावर दुचाकीस्वार डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शनिवारवाडा परिसरात नायलॉन मांजामुळे एका दुचाकीस्वार महिलेचा गळा चिरला होता. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. संक्रांतीला पतंगबाजीसाठी वापरण्यात येणार्या नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजामुळे गेल्या वर्षी दोन पोलिस कर्मचारी धनकवडीतील शंकरमहाराज उड्डाणपुलावर जखमी झाले होते. या मांजामुळे पशू, पक्ष्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली होती.
हेही वाचा