
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील 100 गुंड टोळ्यांमधील 649 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्याने गुंडगिरीला चाप बसला आहे.
पोलिस आयुक्तांच्या आदेशाने बिबवेवाडी भागात दहशत माजविणारा गुंड सौरभ शिंदे याच्यासह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
सौरभ शरद शिंदे (वय 22), तेजस शंकर जगताप (वय 20), चंदर उन्नप्पा राठोड (वय 22), अनिकेत सुधीर काटकर (वय 22), पंकज संजय दिवेकर (वय 19, सर्व रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी जगताप आणि काटकर यांना अटक करण्यात आली असून, ते येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. टोळीप्रमुख शिंदे, राठोड, दिवेकर पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. शिंदे आणि साथीदारांनी गेल्या महिन्यात 8 नोव्हेंबर रोजी अप्पर इंदिरानगर परिसरात कुसाळकर किराणा माल विक्री दुकानासमोर तरुणावर हल्ला केला होता. त्याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी शिंदे याने टोळी तयार केली होती. त्याने साथीदारांशी संगमनत करून गंभीर गुन्हे केले होते. त्याच्यासह साथीदारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. शिंदेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे, उपनिरीक्षक बाळू शिरसाट, देवत शेडगे, अनिल डोळसे, कृष्णा फुले यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करून अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त आर. राजा यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी शिंदे टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले. सहायक पोलिस आयुक्त शाहूराजे साळवे तपास करत आहेत.
हेही वाचा