पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने महापालिकेच्या बांधकाम विभागाने म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान डी.पी. रस्ता व नदीपात्रालगत असणार्या मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेलवर शुक्रवारी कारवाई केली. या कारवाईत दीड लाख चौरस मीटर क्षेत्र रिकामे करण्यात आले. म्हात्रे पूल ते राजाराम पूल नदीकाठच्या हरितपट्टा भागात मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल आदी व्यवसाय सुरू आहेत. त्याविरोधात एका सोसायटीने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली होती. यामध्ये झालेल्या सुनावणीनुसार 10 डिसेंबरपर्यंत विनापरवाना शेड, बांधकामावर कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार महापालिकेने 1 डिसेंबर रोजी येथील जागामालकांना व व्यावसायिकांना नोटीस बजावून त्यांचे शेड व इतर बांधकाम काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बांधकाम विभागाने शुक्रवारी सकाळी येथील अतिक्रमणांवर कारवाई केली. महापालिकेने कारवाई करण्यापूर्वीच काही मंगल कार्यालयांनी लग्नसोहळा असतानाही अनधिकृत शेड काढले. या कारवाईत दीड लाख चौरस मीटर क्षेत्र रिकामे करण्यात आले. पूररेषेत असणार्या एका भूखंडावरील भरावही काढण्यात आला. उर्वरित अतिक्रमणावर शनिवारी कारवाई केली जाणार आहे.
या कारवाईत एका मिळकतधारकाने निळ्या व लाल पूररेषेमध्ये केलेला भराव सात जेसीबी लावून काढून घेण्यात आला. या वेळी सहा डंपरच्या मदतीने सुमारे 6000 घन फूट भराव काढून वाघोली प्लांट येथे पाठविण्यात आला. या कारवाईत 7 जेसीबी, 4 गॅस कटर, 3 ब—ेकर, 50 कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनील कदम , उप अभियंता श्रीकांत गायकवाड, कनिष्ठ अभियंता मनोज कुमार मते, शाखा
अभियंता राहुल रसाळे, शाखा अभियंता भावना जडकर, समीर गडइ, ईश्वर ढमाले, सागर शिंदे आदींच्या पथकाने केली.
हेही वाचा