तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : सणसवाडी येथे भाडेकरूंना बोलल्याने शेजार्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि. 28) घडली. सणसवाडी (ता.शिरूर) येथील अशोक दरेकर यांच्या घराशेजारी सोमनाथ दरेकर यांच्या काही खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत. सोमनाथ यांचे भाडेकरू मोठ्याने गोंधळ घालत असल्याने अशोक यांनी अखिलेश जहा या भाडेकरूला आरडओरडा करू नका, असे म्हटले होते. दरम्यान, अखिलेश याने अशोक व त्यांच्या पत्नीला दमदाटी करत खोली मालक सोमनाथ यांना फोन करून बोलावले. त्यानंतर सोमनाथ व त्यांच्या पत्नीने तसेच अखिलेशसह पुष्पादेवी या भाडेकरूंनी अशोक दरेकर यांच्या घरात जाऊन अशोक व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.
संबंधित बातम्या :
या वेळी अशोक यांना चक्कर आल्याने ते रस्त्यावर पडले. दरम्यान, नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत अशोक तुकाराम दरेकर (वय 70, रा.सणसवाडी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोमनाथ बबन दरेकर, सविता सोमनाथ दरेकर, अखिलेश जहा व पुष्पादेवी (सर्व रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे या घटनेचा तपास करीत आहेत.