पुणे महापालिका आखाडयात शहा- पवार आमने-सामने | पुढारी

पुणे महापालिका आखाडयात शहा- पवार आमने-सामने

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिका मधील भाजपकडील सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सरसावले असतानाच भाजपचे चाणक्य केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हे या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील हा सामना थेट शहा विरुध्द पवार असाच रंगण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिका मधील नविन विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वार जवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावर आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावतीने भेट देण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भुमिपुजन या समारंभासाठी अमित शहा दि. 26 नोव्हेंबरला महापालिकेत येणार आहेत. त्यांचा हा कार्यक्रम राजकियदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.

महापालिका निवडणुका अवघ्या दोन अडीच महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे महापालिकेवर स्वत: शहांचे लक्ष असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वी नगरसेवकांच्या कार्यशाळेत सांगितले होते. तर दुसरीकडे भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी स्वत: शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ताकदपणाला लावली आहे. त्यातच आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ही सत्ता टिकविण्याचे भाजपपुढे आव्हाण आहे.

या सगळया पार्श्वभुमीवर भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शहा थेट महापालिकेत येत आहे. त्यामुळे पवारांपाठोपाठ आता शहांनी थेट पुण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यापुर्वी गेल्या साडेचार-पावने पाच वर्षात शहा महापालिकेच्या एकाही कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले नव्हते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेत कार्यक्रम घेऊन त्यांनी एक प्रकारे पवारांनाच इशारा दिला असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीतील हा सामना अगदी रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट आहे.

भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार !

अमित शहा यांच्या या दौर्‍याच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अनापौराचारिक नारळ फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील समारंभानंतर शहर भाजपने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यात शहा मार्गदर्शन करणार आहेत. या दौर्‍यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी मंगळवारी महापौर बंगल्यावर महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकार्‍याची बैठक पार पडली.

Back to top button