पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका. मात्र, आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्यासाठी 1 डिसेंबरपासून गाव तिथे साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सकल मराठा समाज खराडी-चंदननगर, पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
जरांगे पाटील म्हणाले, 'मराठा आरक्षण मिळू नये म्हणून मराठा आणि ओबीसी यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आपण संयम ठेवायचा आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करून जनजागृती करायची. मराठा आरक्षणाची लढाई खूप पिढ्यांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी टोकाची झुंज दिली.'
मराठे सढळ हाताने इतरांना देत राहिले. आरक्षण देतानाही, कधीही भेदभाव केला नाही. कोणाला मिळाले आणि आम्हाला का मिळाले नाही याविषयी शब्द काढला नाही. स्वतःचं आरक्षण असतानाही दुसर्याला दिलं. तरीही मराठे कधीही 'तुम्ही घेऊ नका' असे म्हणाले नाहीत, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
ओबीसींची संख्या 60 टक्के आहे असे एक नेता बोलत आहे. मात्र, खोटी माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. पंधरा दिवस मी काहीही बोललो नाही, परंतु, गेल्या चार दिवसांत मराठा आरक्षण आणि माझ्याबद्दल बरेच काही बोलले असल्याचे मला कळले. वय झालं म्हणून काहीही बरळू नये. वास्तविक म्हातारपणात अशी अवस्था होत असते, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.
बापजाद्यांच्या संस्कारावर आमची वाटचाल सुरू आहे. 75 वर्षांत सर्व नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठ्यांनी केले. आजही सर्व पक्षातील नेत्यांना मराठे मोठे करत आहेत. आरक्षणापायी मराठ्यांच्या घरातील लेकरू त्रास सहन करत आहे. पण, ज्यांना मोठे केले ते मदतीला येत नाहीत. आपल्या बापजाद्यांनी ज्यांना मोठे केले तेच आज आपल्या समोर आहेत. तेच म्हणताहेत मी तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी या वेळी सांगितले.
मराठ्यांचे पुरावे असतानाही नाही म्हणून सांगितले जायचे. ज्या-ज्या समित्या झाल्या त्यांनी सांगितले पुरावे सापडत नाहीत. त्यावर आजपर्यंत मराठ्यांनी विश्वास ठेवला, 75 वर्षांनी आज 2023 मध्ये मराठा समाजाचे पुरावे सापडायला लागले आहेत. त्यावेळी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं. मग मराठ्यांना आरक्षण का नाही. मंडल कमिशनने जी जात ओबीसीमध्ये घातली, त्याची पोटजात म्हणून आणखी एक जात घातली. मग, मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? नितीन करीर यांना मराठा आरक्षणासंर्दभातील एका समितीचे अध्यक्ष केले. तीन महिन्यांत त्यांनाअहवाल द्यायचा होता. पण, करीर यांना माहीतच नव्हते की ते समितीचे अध्यक्ष आहेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा