जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून जुन्नर येथे शिवसंस्कार सृष्टी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार, अशी घोषणा सुमारे चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर या प्रस्तावित 'शिवसंस्कार सृष्टी" प्रकल्पाचे सादरीकरण डॉ. कोल्हे व अधिकार्यांनी डिसेंबर 2020 मध्ये मुंबई येथे केले होते. मात्र अद्यापही त्याबाबत कोणतेही काम झाले नसून ही घोषणा हवेत विरल्याचे दिसून येत आहे.
येथील वडज धरण वसाहतीच्या रिकाम्या, शासकीय जागेत हा प्रकल्प उभारला जाणार होता. राजमाता जिजाऊंनी शिवरायांवर केलेले संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श जीवनशैली या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या या प्रस्तावित प्रकल्पात बारा बलुतेदारांपासून ते शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य, संत परंपरा आदी विविध दालनांचा समावेश असल्याचे या सादरीकरणात दर्शवण्यात आले होते.
यावेळी खासदार डॉ. कोल्हे, पर्यटन सचिव खामकर, ज्येष्ठ वास्तुरचना तज्ज्ञ संदीप शिखरे, प्रेषित जोशी, नितीन कुलकर्णी, अमोल हरपळे आदी मंडळी उपस्थित होती. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वडज धरणाच्या रम्य परिसरात या प्रकल्पाची उभारणी होणार होती. त्याबाबतची जागा, होणारा अपेक्षित खर्च, प्रशासकीय मान्यता आदींबाबत वेगाने हालचाली सुरू असल्याचे आमदार अतुल बेनके यांनीही वेळोवेळी सांगितले होते. मात्र अद्यापतरी याबाबत कोणतीच हालचाल दिसत नसल्यामुळे शिवप्रेमी युवक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. भविष्यात हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून यामुळे स्थानिक युवकांनाही रोजगार निर्मिती होणार आहे, मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवीच, हे मात्र नक्की.
हेही वाचा