रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव (ता. दौंड) येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास रुग्णालयात दाखल करताना त्याच्या पिशवीत सापडलेले एक लाख रुपये तरुणाने नातेवाइकाकडे सुपूर्द करत प्रामाणिकपणा दाखविला. अमित गणेश भोपाळ यांच्या प्रमाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तांदळी (ता. शिरूर) येथील मनोज विष्णुदास कुलकर्णी हे बुधवारी (दि.15) दुचाकी(एमएच 12 एमके 1973) वरून भिगवणकडे जात होते. रावणगाव इरिगेशन कॉलनीजवळ विरुद्ध दिशेने येणार्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली.
संबंधित बातम्या :
त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्याजवळ असणारी पिशवी अपघातानंतर बाजूला पडली होती. अपघातानंतर शेजारील शेतात काम करीत असणारे अमित भोपाळ मदतीला धावून आले. त्यांनी रावणगाव विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष विकास गावडे यांच्या मदतीने जखमीस भिगवण येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तसेच कुलकर्णी यांच्या पत्नीस दूरध्वनीवरून संपर्क साधत अपघात तसेच एक लाख रुपयांची पिशवी आपल्याकडे ठेवल्याची माहिती दिली. माहिती मिळताच जखमींचे चुलत बंधू श्रीराम धनंजय कुलकर्णी हे अपघातस्थळी आले. तेथे भोपाळ यांनी रावणगाव औट पोस्टचे हवालदार दत्तात्रय कुंभार, शैलेश हंडाळ यांच्या साक्षीने पिशवीत सापडलेले एक लाख रुपये परत केले. भोपाळ यांच्या या प्रमाणिकपणाचे उपस्थितांनी कौतुक केले. या वेळी नवनाथ भोपाळ, कुमार चव्हाण, राजू रांधवण, रामभाऊ गायकवाड उपस्थित होते.