चाकण : पुढारी वृत्तसेवा : भामा आसखेड व चासकमान धरण पुनर्वसनांंतर्गत 40 वर्षांपासून शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर मारलेले शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठी चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी (दि. 16) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बैलगाड्या, बैलजोड्या आणि पाळीव जनावरे घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरल्याने चाकण ते शिक्रापूर रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 29ऑक्टोबर 2023 पासून काळुस (ता. खेड) येथे पुनर्वसनाचे शिक्के काढण्याबाबत व मराठा आरक्षण मिळण्याबाबत बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. कोणतेही जबाबदार शासकीय अधिकारी उपोषण ठिकाणी शेतकर्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलेले नाहीत.
संबंधित बातम्या :
त्यामुळे सर्व शेतकरीबांधवांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भोसे (ता. खेड) या ठिकाणी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास केले. शेतकरी आपल्या बैलगाड्या जनावरांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य रयत क्रांती संघटनेचे युवा घडीचे अध्यक्ष सागर खोत, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्योती आरगडे, मनोहर वाडेकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, सुभाष पवळे, नवनाथ आरगडे, सुभाष पोटवडे, बाजीराव लोखंडे, मोहन पवळे आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. शेतकर्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचून त्यावर निश्चित मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. या वेळी गजानन गांडेकर, सुभाष पवळे, बाळासाहेब दौंडकर, विश्वास पोटवडे, नवनाथ आरगडे, विठ्ठलशेठ आरगडे, सुनील पोटवडे, परशुराम खैरे, सुभाष पोटवडे, भिवाजी जाचक, सारिका पवळे, संतोष पवळे, संतोष खलाटे, नितीन दौंडकर यांच्यासह गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. बाळासाहेब दौंडकर यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले. 29 ऑक्टोबरपासून काळुस ग्रामपंचायतसमोर सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलन लिंबू-पाणी देऊन स्थगित करण्यात आले. चाकण पोलिसांनी या वेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता.