
वाघोली : पुढारी वृत्तसेवा : वाढत्या प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असताना वाघोली व परिसरात सर्रास कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे हरित लवादाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. कचरा जाळून प्रदूषण करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
वाघोली व परिसरात ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य वाढले आहे. मोठ्या प्रमाणावर साठलेला कचरा जाळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रचंड धुराचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांना श्वसन, डोळे, फुफुस संसर्ग असे विविध गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उच्च न्यायालयाने देखील प्रदुषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असताना आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हवेतील प्रदूषणातील सूक्ष्म कण आणि विषारी रसायनांच्या संपर्कात आल्याने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याने स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. वाघोलीसह परिसरात, पुणे-नगर रोडलगत, विविध ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत. मोठ्या प्रमाणावर साचलेल्या कचर्याला जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. मनपा वरिष्ठ आरोग्य निरीक्षक ए. व्ही. ढमाले यांच्याशी संपर्क केला असता कचरा जळणार्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
मनपा आरोग्य विभागाने वेळीच कचरा उचलणे गरजेचे आहे. कचरा लवकर उचलून त्याचे वर्गीकरण केल्यास कचरा जाळण्याला आळा बसेल. त्यामुळे प्रदूषण वाढणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही. – रामभाऊ दाभाडे माजी सरपंच, वाघोली