शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे देहावसान | पुढारी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे देहावसान

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : आपल्या रसाळ, लालित्यपूर्ण शैलीने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरांत नेणारे, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवत वीरश्री अन् राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवणारा शब्दयज्ञ साठहून अधिक वर्षे करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे देहावसान झाले. वयाच्या शतकात पदार्पण केल्यानंतर साडेतीन महिन्यांतच शिवशाहिरांनी शिवकालीन इतिहासाने भारलेल्या आयुष्याचा निरोप घेतला.

बाबासाहेबांच्या मागे चिरंजीव अमृत आणि प्रसाद, तसेच कन्या माधुरी आणि शिवशाहिरांच्या अखंड शिवयज्ञामुळे शिवरायांच्या गडकिल्ल्यांची सतत सफर करणारे लाखो शिवभक्त असा परिवार आहे. शिवशाहिरांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे. त्यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेे. त्या वनस्थळी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्यरत होत्या. माधुरी या ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि गायिका आहेत. ज्येष्ठ चिरंजीव अमृत हे पुरंदरे प्रकाशनची जबाबदारी सांभाळतात, तर लहान चिरंजीव प्रसाद यांनी नाट्य, तसेच दुचाकींच्या क्रीडा प्रकारांत काम केले आहे.

कोरोनाची महासाथ सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देश-परदेशात अखंड भ्रमंती करणार्‍या बाबासाहेबांनी गेल्या 29 जुलैला शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते. गेल्या विजयादशमीला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते.

शिवशाहिरांचा असा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू असतानाच 26 ऑक्टोबरला सकाळी ते उठले आणि त्यांचा तोल गेला. त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना न्युमोनिया झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यांची प्रकृती खालावत गेली, ती रविवारी सायंकाळी आणखी चिंताजनक बनली.

सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली, असे डॉक्टरांनी अधिकृतरीत्या जाहीर केले. हृदयविकाराचा झटका, न्युमोनिया तसेच अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. बाबासाहेबांचे पार्थिव त्यांच्या पर्वती पायथ्याला असलेल्या पुरंदरे वाड्यावर आणण्यात आले. तोवर तेथे शिवशाहिरांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून गर्दीला अंत्यदर्शनासाठी सहकार्य केले. वाड्यात तळ मजल्यावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हेे, आमदार मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज कौस्तुभ देशपांडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, निवृत्त हवाईदलप्रमुख भूषण गोखले, ज्येष्ठ लेखक आनंद माडगूळकर, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. सतीश देसाई, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेतून बाबासाहेबांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथे धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांना जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीश बापट, खासदार अरविंद सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सहायक संचालक सुनीता आसवले यांनीही पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

* संपूर्ण शासकीय इतमामात पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलिस दलातर्फे त्यांना बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्याकडे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.

त्यानंतर त्यांचे पार्थिव मान्यवरांसह सामान्य नागरिकांना अंत्यदर्शनासाठी काही वेळ तेथेच ठेवण्यात आले होते. विद्युतदाहिनी क्रमांक 2 येथे बाबासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र अमृत पुरंदरे यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.

Back to top button