पुणे : महापालिका हद्दीतील मात्र, जलसंपदा विभागा ताब्यात असलेला जांभूळवाडी तलाव लवकरच महापालिकेच्या ताब्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाकडे महापालिकेकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. जांभूळवाडी तलाव सुमारे १५० एकरांवर पसरलेला असून, तो सध्या जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे. तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाल्याने तलावात सांडपाणी मिसळते.
परिणामी, तलावात मोठ्या प्रमाणावर जलपर्णीसह प्रदूषण वाढले आहे. तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि विकसनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने कोरोनाच्या साथीपूर्वी तलाव संवर्धन योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, ठेकेदाराने कामच सुरू न केल्याने हा निधी पुन्हा राज्य शासनाकडे परत गेला. तलाव महापालिका हद्दीत आल्याने सध्या महापालिकेकडून तलावाची स्वच्छता व जलपर्णी काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे हा तलाव जलसंपदा विभागाकडून महापालिकेला हस्तांतरीत करावा, अशी मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत नगरविकास विभागाला आदेश दिले आहेत. त्यानंतर या संदर्भात तत्काळ अभिप्राय द्यावा, असे पत्र नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाला पाठवले आहे.
केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण विभागाने महापालिकांना राष्ट्रीय शहरी पूर नियंत्रण आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने पूर नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून केंद्राला पाठवला होता. त्यानंतर केंद्राने सुचवलेले बदल करून सुधारित आराखडा सादर केला. या आराखड्याला मंजुरी देत केंद्राने २५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये शहरातील जांभूळवाडी, कात्रज आणि पाषाण या तीन तलावांमधील गाळ काढण्यासाठी २०. कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हेही वाचा