पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सध्या ऑनलाईन व्यवहाराकडे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. मेट्रो, रेल्वे, बसगाड्या, तसेच छोटे मोठे व्यवहारदेखील ऑनलाईन पद्धतीने अर्थात कॅशलेस केले जात आहेत; मात्र राज्य परिवहन महामंडळ बससेवेत प्रवाशांना कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
शहरातील वल्लभनगर आगारातून प्रवास करणार्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पिंपरी- चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख असल्याने बाहेर गावावरुन रोजगारासाठी येणार्यांचे प्रमाण मोठे आहे; तसेच शिक्षणासाठी शहरात येणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे आहे. दिवाळीसाठी आपल्या मूळगावी जाणार्यासाठी किंवा शहरात पुन्हा परतणासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीतून प्रवासास प्राधान्य दिले जाते.
खासगी प्रवासी वाहतूक करणार्यांच्या तुलनेत एसटीच्या तिकिटाचे दर कमी असल्यामुळे सध्या बसेसना मोठी गर्दी दिसून येत आहे; मात्र एस. टी. बसेसमधून प्रवास करताना तिकिटासाठी सुट्या पैशांवरून वाहकाशी विनाकारण वाद होतात. कधीकधी इतर प्रवाशांकडे सुट्या पैशांसाठी विचारणा करावी लागते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात एस. टी. प्रशासनानेही कॅशलेस सुविधा सुरू करणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
लालपरीने प्रवास करण्यासाठी सर्वाधिक प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांचे आहे. एस.टी. प्रवासात महिलांना तिकीटदरात पन्नास टक्के सवलत आहे. त्यामुळे एस. टी. बसेसमधून प्रवास करणार्या महिलांचे प्रमाण वाढले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सेवा ऑनलाईन स्वीकारले जातात. लहान मोठे खासगी चालकदेखील ऑनलाईनपद्धतीने व्यवहार करतात; मात्र त्यामध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणारी सगळ्यांची लाडकी लालपरी मात्र अजूनही कॅशलेस व्यवहाराच्या प्रतीक्षेत आहे.
हेही वाचा