'खासगी वाहतूकदारांच्या सुरक्षेचा बंदोबस्त सरकारकडून'

पुणे; पुढारी वृत्तसेवा

खासगी वाहतूकदारांनी आपल्या गाड्यांना धोका असल्याचे सांगितले. त्याचवेळी गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास एसटी स्थानकामधून त्यांनी आपल्या गाड्या बाहेर काढल्या. त्यांनी थेट मुंबई गाठली. यावेळी त्यांनी आपल्या समस्या परिवहन मंत्र्यांसमोर मांडल्या. खासगी वाहतूकदारांच्या सुरक्षेचा बंदोबस्त सरकारकडून केला जाईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. तसेच, याकरिता नोडल अधिकार्‍याची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही अनिल परब म्हणाले.

गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळत आहे. त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेत सरकारने राज्यभरातील २९ विभागांतर्गत असलेल्या एसटी स्थानकातून खासगी गाड्या सोडण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बुधवार आणि गुरूवारी खासगी गाड्या एसटी स्थानकातून सुटल्या. मात्र, बुधवारी कोल्हापूर भागात खासगी वाहतूकदारांची बस फोडण्यात आली. त्यामुळे घाबरून खासगी वाहतूकदारांनी राज्यभरातील एसटी स्थानकातून आपल्या गाड्या बाहेर काढल्या. आणि थेट सुरक्षेच्या मागणीसाठी मुंबई गाठली.

यावेळी परिवहन मंत्र्यांनी खासगी वाहतूकदार सरकारला मदत करत आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमचीच आहे. असे सांगत खासगी वाहतूकदारांना सुरक्षा पुरविणार असल्याचे सांगितले. तसेच, याकरिता आरटीओ आणि पोलिस यांचे नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करणार असल्याचे सुध्दा सांगितले.

कोल्हापुरात आमची गाडी फोडण्याची घटना घडली. त्यामुळे आमचे नुकसान झाले. आणखी नुकसान होऊ नये, याकरिता आम्ही गुरूवारी एसटी स्थानकातून गाड्याबाहेर काढत थेट परिवहनमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी परिवहनमंत्र्यांनी आम्हाला सुरक्षा पुरविणार असल्याचे सांगून पोलिस आणि आरटीओ यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करणार असल्याचे सांगितले आहे.

– बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना

Exit mobile version