'जय भीम' नवी आशा आणि उमेद जागवणारा ... पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची पोस्‍ट चर्चेत | पुढारी

'जय भीम' नवी आशा आणि उमेद जागवणारा ... पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची पोस्‍ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

‘जय भीम’ या चित्रपटाची सध्‍या सर्वत्र चर्चा आहे. समाजातील शोषित, वंचित घटकांवरील हाेणारा अत्‍याचार या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून पडद्‍यावर आला. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात मांडण्‍यात आलेले वास्‍तव संवेदनशील प्रेक्षकांना हादरवून सोडत आहे. त्‍यामुळेच एक जोरकस सामजिक संदेश देण्यात ‘जय भीम’ यशस्‍वी ठरताेय. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांच्‍यासाेबत गुन्हे आढावा बैठकीमध्ये ‘जय भीम’ चित्रपट पाहिला. यानंतर त्‍यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्‍ट सध्‍या चर्चेत आहे.

अभिनव देशमुख यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, ‘जय भीम’ चित्रपटामध्‍ये अतिशय प्रभावीपणे, तामिळनाडूमध्ये 1995 मध्ये झालेल्या एका उच्च न्यायालयातील खटल्याची गोष्ट मांडण्यात आली आहे. स्वतःच्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी सेंगणी, तिची बाजू कोर्टासमोर प्रभावीपणे मांडून तिला न्याय मिळवून देणारे वकील चांद्रू आणि सर्व दबाव झुकगारून नि:पक्षपातीपणे तपास करून सत्य न्यायालयासमोर ठेवणारे पोलीस अधिकारी पेरीमल स्वामी या कथेतील प्रमुख नायक आहेत; पण कथेचा आत्मा बाबासाहेबांनी दिलेली भारतीय राज्यघटना, तिने प्रत्येक भारतीयाला, विशेषतः समाजातील दुर्बल, वंचित घटकांना दिलेले मूलभूत अधिकार आहेत. ते अधिकार प्रत्यक्षात अमलात येण्यासाठी, व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची क्षमता आणि प्रेरणा देखील बाबासाहेबांच्या विचाराने नायकामध्ये निर्माण झाली आहे.

पोलीस कोठडीमधील अत्याचार, पोलीस तपासामध्ये वैज्ञानिक पद्धतींचा वापराचा अभाव, गुन्हेगारी जमात हा ब्रिटिश काळातील शिक्का मिटवण्याची आवश्‍यकता, अजूनही अस्तित्वात असणारी जातीय विषमता असे अनेक विषय हा चित्रपट अतिशय प्रभावीपणे अधोरेखित करतो. अतिशय अंतर्मुख करणारा अनुभव या चित्रपटाने दिला. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा नायक वर्तमानपत्र वाचण्यासाठी हातात घेतो , तेव्हा निरक्षर आणि आदिवासी संगिनीची सहा वर्षाची पोर देखील त्याच ऐटीत वर्तमानपत्र हातात घेते, तो क्षण भविष्याविषयी नवी आशा आणि उमेद जागवणारा आहे. सर्वांनी पाहावाच असा हा चित्रपट आहे, असेही अभिनव देशमुख यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button