Pimpri Fire News : ज्वाळांपुढे आम्ही हतबल ठरलो…! दाम्पत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाची खंत

Pimpri Fire News : ज्वाळांपुढे आम्ही हतबल ठरलो…! दाम्पत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाची खंत
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सकाळी साडेसहाच्या सुमारास फोन खणखणला.. घटना ऐकून पायाखालची जमीन सरकली. शेजारच्या दुकानात आग लागली असून चौघे जण आत अडकल्याचे मला सांगण्यात आले. मी धावत पळत दुकानाजवळ पोहचलो… अग्निशामक दलाच्या जवानांसह आम्ही शटर उघडण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, शटर तापून आगीचा ज्वाळा बाहेर येऊ लागल्या होत्या. त्यामुळे आम्ही मागे हटलो. आपलं कोणीतरी आत जळत असल्याचे माहिती असूनही रौद्ररूप धारण केलेल्या आगीसमोर आम्ही अक्षरशः हतबल ठरल्याची खंत सौरभ कटारिया यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.

चिखली येथे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. याबाबत चौधरी कुटुंबियांच्या शेजारी असलेला व्यावसायिक तरुण सौरभ याच्याही संवाद साधला. त्या वेळी त्याने उद्विग्न शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सौरभ म्हणाला की, मृत चौधरी काका आणि काकू यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. आम्ही दररोज एकमेकांशी गप्पा मारायचो. दोघेही हसत खेळत व्यवसाय करीत होते. मी 2006 पासून चौधरी यांचा शेजारी आहे; मात्र मला ते कधीही तणावात दिसले नाहीत. चौधरी दांपत्य अनेकांच्या अडीअडचणीला धावून जात होते. त्यामुळे अनेकांशी त्यांची सलगी होती. त्यांची मुलेही गोंडस होती. त्यांचा चेहरा तर डोळ्या समोरूनच जातच नाही.

दुकानाला आग लागली असून काका, काकू आणि मुले आत असल्याचे समजताच आम्ही शटर उघडण्याचा पप्रयत्न केला. मात्र, शटर आणि कुलूपही लालबुंद झाले होते. आगीच्या धुरा सोबतच लोळही बाहेर पडू पाहत होते. अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत असताना शेवटी आम्ही हतबल होऊन पाहत होतो. काही वेळानंतर शटर उचकटून जळालेले मृतदेह आमच्या समोर आले. दररोज डोळ्यासमोर असलेल्या प्रसन्न चेहर्‍यांचा कोळसा झाल्याचे पाहून हहृदय पिळवटून निघाले. दुकान पूर्ण जळून खाक झाले असते तर चालले असते मात्र सोन्यासारखी माणसं जिवंत असायला हवी होती.

समाजबांधवही हळहळले

दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच समाजबांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. निगडी येथे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत बोलताना समाजाचे पदाधिकारी चंदुलाल चौधरी म्हणाले की, चौधरी कुटुंबीय अतिशय प्रामाणिकपणे व्यवसाय करीत होते. समाजाच्या कार्यक्रमात चौधरी दाम्पत्य आवर्जून उपस्थित राहायचे. त्यांचे केवळ दुकान जळून खाक झाले असते, तर आम्ही समाज म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो असतो. मात्र, आता आधार देण्यासाठी त्यांच्या घरातच कोणीही राहिले नाही. वैर्‍यावर देखील येऊ नये, अशी वेळ आमच्या बांधवावर आल्याचे खूप वेदना होत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news