खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : धायरी, नांदेड फाटा परिसरात सिंहगड रस्त्यावर बेशिस्त नागरिक, व्यावसायिक कचरा टाकत आहेत. यामुळे या मार्गावर रातोरात कचर्याचे ढीग साचत असल्याने महापालिका प्रशासनदेखील हतबल झाले आहे. रस्त्यावर कचरा टाकणार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. धायरी फाट्यावरील वांजळे उड्डाणपुलाखाली कचर्यांमुळे सर्वात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी रातोरात कचर्याचे ढीग साचत आहेत. धायरी, नांदेड सिटी गेट ते फाट्याच्या परिसरातही कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांसह रहिवासी हैराण झाले आहेत. रस्त्यावर कचरा फेकणार्यांवर कारवाई करण्याची मागणी खडकवासला भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अतुल चाकणकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, 'अगोदरच सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच कचर्याचे ढीग साचल्याने प्रवाशी व नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने या ठिकाणी नियमित सफाई करण्यासाठी पुरेसे कामगार नियुक्त करणे गरजेचे आहे.'
या भागात सफाई कामगारांची संख्या कमी होती. रस्त्यावरील कचरा गोळा करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पहारेकरीही नेमले आहेत.
– अजय जगधने, आरोग्य निरीक्षक, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
मोकाट कुत्र्यांच्या उपद्रव
सिंहगड रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्यांत सडलेले मांस, अन्न फेकले जात आहे. ते खाण्यासाठी मोकाट कुत्र्यांच्या वावरही या भागात वाढला आहे. या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या अंधारात अचानक हे कुत्रे पादचारी, दुचाकी वाहनचालकांवर हल्ले करत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.