‘ती’ सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होणार ?

‘ती’ सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होणार ?
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या हिंजवडी, माण, मारुंंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासन दरबारी अडकून पडला आहे. निर्णयास विलंब होत असल्याने ती गावे खरोखरच पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेसुमार अनधिकृत बांधकामे, घनकचरा, शुद्ध पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन, अरुंद रस्त्यामुळे नित्याची वाहतुक कोंडी व इतर समस्यांनी ग्रासलेला हा भाग बकाल होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात समाविष्ट होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

क्षेत्रफळाने अगोदर फुगलेल्या पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश 30 जून 2021 ला करण्यात आला. मात्र, पिंपरी-चिंचवडसंदर्भात निर्णय घेण्यास विलंब लावला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या मुद्दयावर खा. श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

शहराला लागून असलेली हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय 10 फेबु्रवारी 2015 च्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. राज्य शासनाच्या नगररचना व विकास विभागाकडे
3 जून 2015 ला प्रस्ताव पाठविला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 31 मार्च 2015 ला स्थापना झाल्याने ती गावे पालिकेत समाविष्ट करण्यास राज्य शासनाने नकार दिला.

त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने 5 फेबु्रवारी 2018 ला पुन्हा सुधारित ठराव मंजुर केला. तो फेरप्रस्ताव 5 एप्रिल 2018 ला शासनाकडे पाठविण्यात आला. महापालिकेच्या प्रस्तावावर शासनाने अनेकदा माहिती मागविली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याबाबत नोव्हेंबर 2020 ला अभिप्राय मागविला. त्यानंतर पुढील कार्यवाही ठप्प आहे. त्या संदर्भात हालचाली बंद आहेत. त्यामुळे या निर्णयाबाबत राज्य शासन सकारात्मक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा व विधानसभा तसेच, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे, फडणवीस व पवार सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वाढली आहे.

शहराच्या सीमेवर नागरी समस्या जटिल

महापालिकेत ती गावे समाविष्ट केली जात नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या परिसरात बेसुमार बांधकामे होत आहेत. बेसुमार व अनियोजितपणे नागरीवस्ती वाढत असल्याने घनकचरा व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. रस्त्याकडेला किंवा महापालिका हद्दीत कचरा आणून टाकला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलंमडले आहे. सक्षम ड्रेनेज व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचून दुर्गंधी निर्माण झाली आहे. रस्ते अरूंद असल्याने वाहतूक कोंडींची समस्या नित्याची झाली आहे.

प्रचंड वर्दळीमुळे हिंजवडी, मान, मारूंजी भागात वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे. लोकवस्ती वाढत असल्याने इतर समस्यांनी भीषण रूप धारण केले आहे. त्याचा ताण अप्रत्यक्षरित्या शेजारच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पडत आहे. सीमेवरील भागातील विद्रुपीकरण थांबविण्यासाठी तसेच, नियोजनबद्ध विकासासाठी महापालिकेची सक्षम यंत्रणा अत्यावश्यक असल्याचे अधिकार्‍यांचे मत आहे.

पुणे शहरातील तीन भाग देण्यासही विलंब

दिघी, कळस, बोपखेल हा भाग पिंपरी-चिंचवड व पुणे अशा दोन शहरात विभागला आहे. भौगोलिक विचार केल्यास हे तीनही भाग पिंपरी-चिंचवड शहरात असावेत, असे अधिकार्‍यांचे मत आहे. त्यानुसार पुणे शहरातील दिघी, कळस व बोपखेलचा उर्वरित भाग
पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पडून आहे.

निर्णयाची प्रतीक्षा

तो परिसर बकाल होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट होणे गरजेचे महापालिकेत शहराच्या सीमेवरील 7 गावे व 2 भाग समाविष्ट करण्याचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पाच वर्षे झाली तरी, अद्याप निर्णय झालेला नाही. तो भाग अनधिकृत बांधकामांमुळे बकाल होऊ नये. त्यापूर्वी महापालिकेत समाविष्ट होण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आग्रही आहे, असे महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी सांगितले.

प्रस्तावातून अनेक गावे वगळली

देहू व आळंदी तीर्थक्षेत्र तसेच, चाकण एमआयडीसीचा भाग समाविष्ट करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत घेतला होता. नगरपालिका असल्याने आळंदी व चाकणचा समावेशाचा मुद्दा मागे पडला. त्यानंतर देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झाल्याने देहूगावही वगळण्यात आले. तसा, सुधारित प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला आहे. तसेच, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे ही गावेही प्रस्तावातून वगळण्यात आली आहेत.

पीएमआरडीएची नकारघंटा कायम

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आराखड्यानुसार हिंजवडी येथे क्लस्टर निर्माण केले जाणार आहे. त्याबाबत पीएमआरडीएने नियोजन केले आहे. त्यामुळे पीएमआरडीएने हिंजवडीसह, गहुंजे, जांबे, मारूंजी, माण, नेरे व सांगवडे ही सातही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यात स्पष्ट नकार दिला आहे. त्यासंदर्भात पीएमआरडीएने राज्य शासनला कळविले आहे. पीएमआरडीएची नकार घंटा अद्याप कायम आहे.

त्या गावांचे एकूण क्षेत्रफळ 56.72 चौरस किमी

गहुंजे- 5.05 चौरस कि.मी., जांबे-6.37 चौरस किमी., मारूंजी-6.55 चौरस किमी., हिंजवडी-8.33 चौरस किमी., माण-19.05 चौरस किमी., नेरे-5.32 चौरस किमी., सांगवडे-3.44 चौरस किमी., दिघी -2.25 चौरस किमी., कळस- 0.36 चौरस किमी. : एकूण-56.72 चौरस किमी.
पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्रफळ 181 चौरस मीटर आहे. ही गावे व भागांचा समावेश झाल्यानंतर शहराचे एकूण क्षेत्रफळ 237.72 चौरस किलो मीटर होणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news