वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकाचालकांसह कंत्राटी कामगारांवर पगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटदाराकडून मिळणारे वेतन पाच महिन्यांपासून बंद आहे. कंत्राटी चालक, कामगारांना वेतन देण्यासाठी निधी नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. शासनाकडून जिल्हा परिषदेला कंत्राटी कामगारांना वेतन करण्यासाठी ऑक्टोबर 2022 पासून निधी मिळालेला नाही.
खेड्यापाड्यासह उपनगरी गावातील आरोग्य सेवेचा मुख्य कणा म्हणून 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सज्ज असतात. मात्र, रुग्णवाहिका चालकांना दरमहा कंत्राटदाराकडून मिळणारे 9 हजार 555 रुपयांचे वेतन पाच महिन्यांपासून मिळालेले नाही. एप्रिलनंतर वेतन न मिळाल्याने चालक हवालदिल झाले आहेत. चालकांप्रमाणेच प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशीयन, फार्मसिस्ट, शिपाई आदी पदावर काम करणार्या कंत्राटी कामगारांनाही पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.
चार महिन्यांपासून वेतन नाही
खानापूर ( ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे चालक चेतन शिनगारे म्हणाले, वेतन मिळेल या आशेवर चार महिन्यांपासून वाट पाहत आहे.
रुग्णवाहिका चालक व कंत्राटी कामगारांना वेतन करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न मिटेल. निधी नसल्याने वेतन रखडले आहे. शासनाकडून निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने स्वत:च्या पैशांतून तीन महिन्यांचे वेतन कामगारांना दिले आहे.
– डॉ. राम हुंकारे आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
हेही वाचा :