नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नवी सांगवी येथील फेमस चौकाकडून शनी मंदिराच्या दिशेने जुन्या सांगवीकडे जाणार्या वळणावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याच मार्गावर रस्त्याच्याकडेला एक चेंबर खचले आहे. त्यामुळे पादचार्यांना तसेच वाहनचालकांना ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
येथील वळण मार्गावर रस्त्याच्याकडेला असणारे चेंबर खचले आहे. त्यामुळे तेथे खड्डा पडला आहे. या ठिकाणी बस थांबा आणि रिक्षा थांबा असल्याने शालेय विद्यार्थ्यांची, नागरिकांची तसेच वाहनचालकांची रात्री-अपरात्री सतत वर्दळ सुरू असते. तर पादचार्याचा पाय त्या तुटलेल्या चेंबरमध्ये अडकून गंभीर अपघाताची शक्यता आहे. संबंधित महापालिकेच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित येथील चेंबरची दुरुस्ती करावी. तसेच, चेंबरवरील तुटलेले झाकण बदलून तो सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
दरम्यान, या परिसरात महापालिकेच्या वतीने रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. या दोन्हीही रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराला मिळाले आहे. असे असताना रस्त्याच्या बाजूला असणारे धोकादायक चेंबरचे तुटलेले झाकण ठेकेदाराला अथवा संबंधित महापालिकेच्या अधिकार्यांना दिसत नाही. याकडे डोळेझाक करण्यात येत असल्याने नागरिकांनी तक्रार केल्याशिवाय कामेच करायची नाहीत का? असा सवाल केला जात आहे.
येथील परिसरात वळण मार्ग आहे. तसेच आजूबाजूला पावसाच्या पाण्याचे खड्डे आणि गवत असल्याने रस्त्यावरून वाहनचालकांना खड्डा चुकवून पुढे जावे लागते. त्यामुळे मागच्या वाहनचालकांची फसगत होते. वळणावरच खड्डा असल्याने अपघाताची दाट शक्यता आहे. येथील रिक्षाचालकांनी व नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्पुरते लोखंडी बॅरिकेड आडवे टाकून खड्डा झाकला होता. त्यावर झाडाच्या फांद्याही टाकल्या होत्या. तेही काढण्यात आल्या आहेत.
हेही वाचा