नानगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील नानगावच्या गणेश रोड येथील संजय रणदिवे यांच्या घराशेजारी रात्रीच्या वेळेला बिबट्या आला. त्याने घराजवळील बदकावर झडप घेत त्याची शिकार केली आणि तेथून पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या दौंड तालुक्यातील बागायती व भीमा नदीपट्ट्यात दिवसेंदिवस बिबट्यांची कुटुंब वाढत आहेत. रोज कुठे ना कुठे शेतकरी तसेच नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असून, कुठेतरी बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडत आहे.
अशीच एक घटना नुकतीच नानगाव (ता. दौंड) येथील गणेश रोड परिसरातील संजय रणदिवे यांच्या घराजवळ घडली. गेली दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी बिबट्या शिकारीच्या शोधत घराजवळ आला. बिबट्याला तेथे बदक दिसताच त्याने बदकावर हल्ला केला व बदकाची शिकार करून त्या ठिकाणाहून पसार झाला. गेली काही दिवसांपूर्वी नानगाव येथील मांगोबामाळ परिसरातील खळदकर वस्ती येथे एका शेतमजुरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाले होते. त्यामुळे याआधीच गावात बिबट्याची दहशत असून, पुन्हा एकददुसर्या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.