भिगवण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सर्वांना पाण्याची सोय होते म्हणून मोठ्या उदात्त भावनेने इंदापूर तालुक्यातील पिंपळे येथील शेतकर्याने स्वमालकीची होती नव्हती तेवढी जमीन पोंधवडी तलावाला दिली, त्याबदल्यात सरकारने नवीन शर्तीची वन जमीन शेतकर्याला दिली. मात्र तब्बल 52 वर्षांनी जागे झालेल्या वन विभागाने या शेतकर्याला क्षणात भूमिहीन करून उघड्यावर आणले आहे.
याबाबत तीन वर्षे संघर्ष केला. मात्र, पाषाणवृत्तीच्या सरकारच्या सर्व विभागांपुढे आता या शेतकर्याचे सर्व बाजूने मनोबल व मनोधैर्य खचल्याने 15 ऑगस्ट रोजी कुटुंबासह इंदापूर वन विभाग कार्यालयात आत्मदहनाचा इशारा या पिढीत शेतकर्याने दिला आहे. नुसता इशारा नाही तर पोलिस व शासकीय यंत्रणेने दबाव आणला, तर अचानक वन मंत्रालयात जाऊन स्वतःला 'धर्मा पाटील' करून घेण्याचा पक्का निर्धार केला आहे.
सुनील साहेबराव बागल (रा. पिंपळे, ता. इंदापूर) असे या पीडित शेतकर्याचे नाव असून, वन विभागाने त्यांचे जगणे असाहाय्य करून टाकले आहे. याबाबत शेतकर्याची कर्मकहाणी अशी की, पोंदवडी तलावासाठी सुनील बागल यांच्या वडिलांची भोगवटा 1 ची गट नंबर 229 मधील जमीन संपादित करण्यात आली.
त्या बदल्यात शासनाने 1971 साली त्यांना पिंपळे येथे जमीन गट नंबर 15/ 2/अ ही पडीक जमीन एका वर्षासाठी कबूल लायतीने दिली व 1983 साली इंदापूर तहसीलदारांच्या आदेशाने तसेच योग्य कागदपत्रांची शहानिशा करून ही पडीक जमीन बागल यांना कायमस्वरूपी दिली यासाठी शासनाचे अनर्जित रक्कम उपकोषागारात भरण्यात आली. त्याप्रमाणे फेरफार, सातबारा नंबर 222 ने बागल यांचे नावे पाच हेक्टर 87 आर जमीन झाली. ही जमीन दुरुस्त करण्यासाठी बागल यांना स्वखर्चासह सावकाराकडून पैसे घ्यावे लागले.
गेली 50 वर्षे बागल हे जमीन वहिवाटून आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत आले आहेत. असे असताना कोणतीही कल्पना, नोटीस न देता वन विभागाने 17 जून 2020 मध्ये उभ्या पिकात तसेच जनावरांचा गोठ्यावर अचानक येऊन जेसीबीचा नांगर फिरवला आणि क्षणात सुनील बागल उघड्यावर आले.
अनपेक्षित घडल्या प्रकाराने बागल कुटुंब अक्षरशः हवालदिल झाले आणि या गरीब शेतकर्याने वन विभागासह, तहसील व इतर सर्व विभागांला आपली रीतसर कागदपत्रे दाखवली, त्याचा तीन वर्षे पाठपुरावा आहे. तसेच दखल घ्यायला तयार नसल्याने बागल यांनी बारामती न्यायालयात दाद मागितलेली आहे. मात्र, कसण्यास शेती नाही, उपजीविकेचा गंभीर प्रश्नापुढे हे कुटुंब आता आर्थिक विवंचनेत सापडले असून, चूक नसताना त्यांच्या वाट्याला हे भोग आल्याने त्यांनी आता आपला 'धर्मा पाटील' करून घेण्याचा पक्का निर्णय घेतला आहे.
सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा काय निर्णय लागेल त्यावर सर्व अवलंबून आहे. त्याबाबत अधिक भाष्य करता येणार नाही. बागल यांना आत्मदहनापासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अजित सूर्यवंशी, इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र
हेही वाचा